कोरोनाच्या सावटामध्ये वर्षभरात ८ लाखांवर वीज जोडण्या; महावितरणाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 04:49 PM2021-04-03T16:49:26+5:302021-04-03T16:49:37+5:30
प्रलंबित वीजजोडण्या देखील ताबडतोब कार्यान्वित करण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिले आहेत.
मुंबई : कोरोना विषाणूच्या महामारीच्या काळात देखील महावितरणकडून ग्राहकांना वीजविषयक सर्व सेवा सुरळीत व अविरतपणे देण्यात येत असून गेल्या आर्थिक वर्षात सर्व वर्गवारीतील तब्बल 8 लाख 2 हजार 782 नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. दरम्यान आवश्यक प्रमाणात नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यात येत असल्याने प्रलंबित वीजजोडण्या देखील ताबडतोब कार्यान्वित करण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिले आहेत.
महावितरणकडून दरवर्षी मागणीनुसार साधारणतः 9 ते 10 लाख नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात येतात. मागील वर्षी मार्च ते जूनपर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लॉकडाऊन असल्याने नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्याचा वेग मंदावला होता. तरीही इतर वीजसेवांप्रमाणेच नवीन वीजजोडणी देण्याच्या कामात कोणताही खंड पडला नाही. एप्रिल 2020 ते मार्च 2021 या कालावधीत उच्चदाब व लघुदाब वर्गवारीतील 8 लाख 2 हजार 782 नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक कोकण प्रादेशिक विभागामध्ये 2 लाख 85 हजार 332 तर पुणे प्रादेशिक विभाग – 2 लाख 28 हजार 693, नागपूर प्रादेशिक विभाग – 1 लाख 65 हजार 181 आणि औरंगाबाद प्रादेशिक विभागामध्ये 1 लाख 23 हजार 571 नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वीजमीटरचा तुटवडा कमी करण्यासाठी महावितरणकडून सिंगल फेजचे 18 लाख व थ्री फेजचे 1 लाख 70 हजार नवीन वीजमीटरचा पुरवठा करण्याचे आदेश पुरवठादारांना याआधीच देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे महावितरणच्या चारही प्रादेशिक कार्यालयांना मार्चअखेरपर्यंत 3 लाख 35 हजार नवीन वीजमीटरचा पुरवठा करण्यात आला आहे. येत्या एप्रिल महिन्यात देखील सुमारे साडेतीन लाखांवर नवीन वीजमीटर पुरविण्याचे नियोजन आहे. वीजमीटरअभावी ग्राहकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून उपलब्ध झालेले मीटर तातडीने संबंधीत ग्राहकांकडे कार्यान्वित करण्याचे निर्देश मुख्य कार्यालयाकडून क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहेत. ग्राहकांना खुल्या बाजारातून नवीन वीजमीटर खरेदी करण्याची आता आवश्यकता नाही, असेही महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
उच्च व लघुदाब वर्गवारीमध्ये घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी व इतर वर्गवारीतील 6 लाख 27 हजार 529 वीजग्राहकांना एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत तर 1 लाख 82 हजार 541 नवीन वीजजोडण्या जानेवारी ते मार्च 2021 या तीन महिन्यांच्या कालावधीत कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक तसेच कृषी अशा सर्व वर्गवारीतील ग्राहकांना नवीन वीजजोडणीच्या अर्जासाठी महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट किंवा मोबाईल अॅपवर ऑनलाईन सोय उपलब्ध आहे. त्याप्रमाणे अर्ज प्राप्त झाल्यानंतर महावितरणकडून नवीन वीजजोडणी देण्याची अंतर्गत प्रक्रियादेखील ऑनलाईन करण्यात आली आहे. अर्ज केल्यापासून त्याची मंजुरीच्या प्रक्रियेतील स्थिती (ट्रॅक स्टेटस) पाहण्यासाठी वीजग्राहकांना ऑनलाईन सोय उपलब्ध आहे.