तब्बल आठ लाख वाहनचालकांनी ओलांडली वेगमर्यादा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 02:50 AM2019-12-27T02:50:43+5:302019-12-27T02:51:11+5:30

राज्यातील गेल्या वर्षातील आकडेवारी; १२ कोटींच्या दंडाची वसुली

Over eight lakh motorists exceed the speed limit | तब्बल आठ लाख वाहनचालकांनी ओलांडली वेगमर्यादा

तब्बल आठ लाख वाहनचालकांनी ओलांडली वेगमर्यादा

Next

मुंबई : रस्ते अपघातासाठी वाहनांचा वेग हे महत्त्वाचे कारण ठरत आहे. त्यामुळे वेगाची मर्यादा ओलांडणाऱ्या वाहनचालकांना पकडून त्यांच्याकडून दंडात्मक रक्कम वसूल केली जात आहे. जेणेकरून अपघात रोखणे शक्य होईल. मात्र असे असतानाही राज्यात मोठ्या प्रमाणावर वाहनचालकांकडून वेगाची मर्यादा ओलांडली जात असल्याचे समोर आले आहे. महामार्ग पोलिसांच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी आठ लाख वाहनचालकांनी वेगाची मर्यादा ओलांडली असून, त्यांच्याकडून सुमारे १२ कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे.

वेगमर्यादा ओलांडणे, नशा करून गाडी चालवणे, सीटबेल्ट, हेल्मेटचा वापर न करणे अशा अनेक वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जाते. अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दंड वसूल केला जातो. जेणेकरून ते नियम पाळतील आणि अपघात रोखता येतील. मात्र तरीही नियमांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी वाहतूक नियमांचे सर्वाधिक उल्लंघन हे वाहनचालकांनी नो र्पाकिंगमध्ये पार्किंग करून केले. २०१८मध्ये अशा तब्बल १९ लाख, २१ हजार, ०७२ घटना घडल्या. यामध्ये तब्बल २४ कोटी, २० लाख, २२ हजार, ९२० रुपयांचा सर्वाधिक दंड वसूल करण्यात आला. या खालोखाल दंडवसुलीत वेगाची मर्यादा ओलांडणाºयांचा नंबर लागतो. गेल्या वर्षी अशा एकूण ७ लाख, ८४ हजार, ९१३ घटना घडल्या. त्या प्रकरणांमध्ये १२ कोटी, ११ लाख, ४५ हजार, १०१ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.


याशिवाय धोकादायकपणे, उलट दिशेने वाहन चालविणे, वाहन चालवताना फोनचा वापर करणे, सिग्नल तोडणे, मार्गिकेची शिस्त न पाळणे अशा प्रकारे विविध वाहतुकीच्या नियमांच्या उल्लंघनासाठीही वाहनचालकांकडून दंडाची वसुली करण्यात आल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.

वर्षभरातील अपघातात राज्यात १३,२६१ मृत्यू

राज्यात गेल्या वर्षी एकूण ३५,७१७ अपघात घडले. यामध्ये १३,२६१ जणांचा मृत्यू झाला. २०,३३५ जण गंभीर, तर ११,०३० किरकोळ जखमी झाले. या अपघातांमध्ये प्रमुख कारण आहे, ते वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे. अनेक वेळा वाहनचालक नियम पाळत नाहीत, पण तेच त्यांच्या जीवावर बेतत असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.

... तर ८० टक्के अपघात कमी होतील
वाहनचालक नियमांचे उल्लंघन करतात, ही मोठी समस्या आहे. कित्येक चालक हेल्मेट घालत नाहीत. सीटबेल्ट लावत नाहीत. भरधाव वेगाने वाहन चालवतात, त्यामुळे अनेक अपघात घडतात. वाहतुकीचे नियम हे वाहन चालकांसाठी, त्यांच्या, सहप्रवाशांच्या व पादचाºयांच्या सुरक्षेसाठीच आहेत. वाहन चालवताना वेगमर्यादा पाळणे, सीटबेल्ट लावणे किंवा हेल्मेट घालणे या नियमांचे त्यांनी पालन केले तर जवळपास ८० टक्के अपघात कमी होतील.
- विजय पाटील, अधीक्षक, महामार्ग पोलीस (मुख्यालय).
 

Web Title: Over eight lakh motorists exceed the speed limit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.