6 वर्षात महिलांवरील अत्याचारांचे 1 लाखांवर गुन्हे, गुन्ह्यांचा वाढता आलेख
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 10:53 PM2020-02-06T22:53:35+5:302020-02-06T22:54:16+5:30
महिला, तरुणींवरील अत्याचाराच्या बहुतांश घटना या एकतर्फी प्रेम आणि लैंगिक वासनेतून घडल्याचे तपासातून पुढे आले आहे
हिंगणघाट येथे भरदिवसा नराधमाने एका तरुण प्राध्यापिकेवर पेट्रोल ओतून जाळल्याच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. त्याबाबत सर्वस्तरावरून निषेधाचे सूर उमटत असताना महिलांवरील अत्याचाराचे प्रकार थांबलेला नाही. त्यापाश्वभूमीवर राज्यातील महिलांवरील अत्याचार व गुन्ह्यांचा आढावा घेणारी मालिका ही मालिका...
सावित्रीच्या लेकींची सुरक्षा ऐरणीवर -१
प्रतिबंधासाठी तोकडी पडते पोलीस यंत्रणा
जमीर काझी
मुंबई : राज्याच्या पोलीस दलाचे धुरा सांभाळणारे महासंचालक तसेच पोलीस आयुक्त व अधीक्षक पदभार स्विकारताना महिला,तरुणीवर अत्याचाराला प्रतिबंध घालण्यात आपला प्राधान्य असेल, असे प्रत्येक अधिकारी ठामपणे ग्वाही देत असलेतरी प्रत्यक्षात मात्र त्यांच्यावरील अत्याचाराचा आलेख सातत्याने वाढत असल्याची परिस्थिती आहे. गेल्या सहा वर्षात तब्बल १ लाख ७ हजार ४४८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे हे केवळ बलात्कार, विनयभंग, हुंडाबळी आणि लैंगिक छळासंबंधी दाखल गुन्ह्यांची संख्या असून प्रत्यक्षात त्याचे प्रमाण दीडपटीहून अधिक असल्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
महिला, तरुणींवरील अत्याचाराच्या बहुतांश घटना या एकतर्फी प्रेम आणि लैंगिक वासनेतून घडल्याचे तपासातून पुढे आले आहे. त्यामुळे राज्यकर्ते आणि पोलिसांकडून महिलांच्या सुरक्षेबाबत सजग असल्याचे कितीही ग्वाही दिली जात असलीतरी प्रत्यक्षात स्थिती मात्र दिवसोंदिवस बिघडत असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणगाव येथे एका विकृताने भर दिवसा प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटविल्याने ती जीवनमरणाची लढाई लढत आहे. या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त होवून निषेध मोर्चे काढले जात आहेत. मात्र राज्यातील कानाकोपºयात सातत्याने रोज अशा घटना घडत आहेत. त्यांना थोपविण्यामध्ये पोलीस यंत्रणा अपुरी पडत असल्याची स्थिती आहे. प्रतिबंधासाठी विविध उपाय योजना राबविल्या जात असल्यातरी त्यामुळे महिलांवरील अत्याचाराला लगाम लागलेला नसल्याचे ‘लोकमत‘ला मिळालेल्या सहा वर्षाच्या आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे.
एक जानेवारी २०१४ पासून ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत महाराष्ट्रात विनयभंगाच्या सर्वाधिक ७३ हजार ३१ गुन्हे दाखल आहेत. तर उपरोक्त मुदतीमध्ये बलात्काराचे २६हजार ५१२ गुन्हे दाखल आहेत.छेडछाड व हुंडाबळीच्या अनुक्रमे ६ हजार ४७५ व एक हजार ४३० घटना घडल्या असून त्यातील निम्याहून अधिक तपासाधीन प्रकरणे आहेत.
(उद्याच्या अंकात - रोज होतायत १२जणीवर बलात्कार तर ३४ विनयभंग)
राज्यात सहा वर्षातील महिलासंबंधी प्रमुख गुन्हे
वर्ष गुन्हे
२०१४ १५२९३
२०१५ १७,२४४
२०१६ १६,७५७
२०१७ १७,६९२
२०१८ २०,२१३
२०१९ २०,२४९
एकुण १,०७४४८
सहा वर्षात बलात्कार, हुंडाबळी, विनयभंग व छेडछाडीच्या १ लाख ७,४४८ गुन्हे दाखल झालेले आहेत. त्याशिवाय महिलांची हत्या, अपहरण, हत्येचा प्रयत्न यासंबंधी अनेक घटना घडलेल्या आहेत. त्यांचे प्रमाणही सातत्याने वाढत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.