दीड महिन्यांपासून आरे कारशेड अहवालाची तपासणी सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 02:27 AM2020-03-12T02:27:24+5:302020-03-12T02:28:03+5:30
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदाशिव खोत आदींनी याबाबतचा तारांकित प्रश्न विचारला होता. नगरविकासमंत्र्यांनी त्याला उत्तर दिले.
मुंबई : मुंबईतील आरे मेट्रो कारशेडच्या स्थगितीनंतर नेमण्यात आलेल्या अभ्यास समितीचा अहवाल २८ जानेवारीला राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. शासनस्तरावर अहवालाची तपासणी सुरू असल्याची लेखी माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदाशिव खोत आदींनी याबाबतचा तारांकित प्रश्न विचारला होता. नगरविकासमंत्र्यांनी त्याला उत्तर दिले. आरे मेट्रो-३च्या कारशेडसाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेवर पर्यावरणीय समतोल साधणे, कारशेडचे बांधकाम करणे व त्या परिसरातील वृक्षसंपदा जतन करणे याबाबतचा अहवाल सादर करण्याकरिता गठीत करण्यात आलेल्या समितीने २८ जानेवारीला आपला अहवाल शासनाला सादर केला आहे. हा अहवाल शासनस्तरावर तपासण्यात येत आहे, असे त्यांनी आपल्या लेखी उत्तरात म्हटले आहे. या समितीच्या अहवालाचा गोषवारा काय, तसेच मेट्रो कारशेडसाठी मुंबईत पर्यायी जागा निश्चित करण्याबाबत कोणती कार्यवाही केली, याबाबतच्या उत्तरात मौन बाळगण्यात आले.