वर्षभरात पोस्टाच्या ‘एटीएम’ला टाळे
By admin | Published: May 22, 2015 01:34 AM2015-05-22T01:34:12+5:302015-05-22T01:34:12+5:30
वर्ष उलटले तरी या केंद्रातील आॅनलाइन प्रक्रिया पूर्ण न झाल्याचे कारण देत खुद्द पोस्ट विभागानेच या केंद्राला टाळे ठोकले आहे.
अनुजा वालावलकर - मुंबई
गेल्या काही वर्षांत खासगी बँकांकडून ग्राहकांना अधिकाधिक सुविधा पुरविण्यात येत आहेत. या बँकांच्या पावलावर पाऊल ठेवत टपाल विभागाच्या सचिव पद्मिनी गोपीनाथ यांच्या हस्ते ६ मार्च २०१४ रोजी राज्यातील पहिले एटीएम सेंटर चेंबूरमध्ये सुरू करण्यात आले. परंतु, वर्ष उलटले तरी या केंद्रातील आॅनलाइन प्रक्रिया पूर्ण न झाल्याचे कारण देत खुद्द पोस्ट विभागानेच या केंद्राला टाळे ठोकले आहे. त्यामुळे या आॅनलाइन प्रक्रियेच्या गैरसोयीमुळे ग्राहक आणि कर्मचाऱ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे.
टपाल खात्याचे एटीएम नसल्याने खातेदार खासगी बँकांकडे वळत होते. त्यामुळे ग्राहकांना टपाल विभागाकडून अधिक सुविधा देण्याच्या उद्देशाने टपाल विभागाकडून अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. एटीएम सेंटरची उभारणी आणि कोअर बँकिंग सोल्युशन्स हे त्यापैकी दोन महत्त्वाचे प्रकल्प आहेत. एटीएम केंद्र सुरू झाल्यावर टपाल विभागाने कर्मचाऱ्यांना क्रेडिट कार्ड देण्यात येईल असे सांगितले होते, मात्र अजूनही त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. शिवाय, टपाल विभागाशी आजही नाते टिकवून असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना या गैरसोयीचा चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे टपाल विभागाच्या आश्वासनांवर किती काळ थांबायचे याबाबत साशंकता निर्माण
झाली आहे. मुंबईतील पहिलेच एटीएम केंद्र बंद पडल्याने ते दुरुस्त करण्यासाठी भारतीय डाक विभाग काय पावले उचलणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पोस्टाच्या एटीएम योजनेच्या आॅनलाइन प्रक्रियेत अजूनही काही त्रुटी असून त्या पूर्ण करण्याचे काम सध्या सुरू आहे. ती प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी बराच वेळ लागेल. त्यामुळे चेंबूरप्रमाणेच मुंबईतील इतर एटीएम केंद्रसुद्धा सध्या बंद ठेवण्यात आली आहेत. शिवाय, या एटीएम केंद्राला तितकासा प्रतिसादही मिळत नव्हता. याविषयी भांडुप येथील पोस्ट कार्यालयातील अधिकारी रेखा रिझवी यांच्याकडेही तक्रार केली होती, मात्र तरीही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.
- पी. एन. कांबळे, सहायक निर्देशक,
मुंबई विभाग, जनरल पोस्ट आॅफिस (जीपीओ)