मुंबई - ठाण्यातील गोळीबार प्रकरणावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला असून खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार असल्याचं म्हटलंय. दुसरीकडे आता शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी आमदार गणपत गायकवाड यांचे मुख्यमंत्री शिंदेंकडे कोट्यवधी रुपये असल्याचा दावा केला आहे. एका सभेत बोलताना राऊत यांनी जाहीरपणे हे विधान केले. त्यामुळे, आता मुख्यमंत्री शिंदे राऊतांच्या विधानावर काय प्रतिक्रिया देताता, हे पाहावे लागेल.
ठाण्यातील गोळीबारावर बोलताना आमदार गणपत गायकवाड यांनी घडलेला प्रसंग सांगताना मी आत्मसंरक्षणासाठी गोळ्या झाडल्याचं म्हटलं आहे. पोलिस स्टेशनच्या दरवाजामध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की केली. माझ्या जागेचा या लोकांनी जबरदस्तीने कब्जा घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रात गुन्हेगारांचे राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. शिंदे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात फक्त गुन्हेगारच पैदा होतील. आमच्यासारख्या चांगल्या माणसाला एकनाथ शिंदे यांनी गुन्हेगार बनवले आहे, असे अनेक गंभीर आरोप भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केले आहेत. आता, आमदार कदम यांच्या आरोपांना खो देत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केला आहे. गृहमंत्री फडणवीस हे जर कायद्याचं राज्य असेल, तर गणपत गायकवाड यांनी सांगितलेलं आहे की, मी कोट्यवधी रुपये एकनाथ शिंदेंकड दिले आहेत. मग, त्या पैशांचा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल, असे म्हणत शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले. तसेच, हे पैसे का, कसे आणि कुठून आले आहेत, माझ्या माहितीप्रमाणे हे पैसे १५० कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचंही राऊत यांनी म्हटले.
माझ्या माहितीप्रमाणे ही रक्कम १५० कोटींपेक्षा जास्त असल्याचं गणपत गायकवाड सांगतात. कारण, एकनाथ शिंदेही लाखात बोलत नाहीत, किमान ५० खोके असं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे आमदार गणपत गायकवाड यांचे १५० कोटींपेक्षा जास्त रुपये असल्याचं म्हटलं आहे.
शिंदे भाजपासोबतही गद्दारी करतील- गायकवाड
आमदार गायकवाड म्हणाले की, मी एक व्यावसायिक माणूस आहे; पण माझे आयुष्य खराब होत असेल, माझ्या मुलांना कोणी काही करत असेल, गुन्हेगार त्याला मारत असतील तर मी शांत बसणार नाही. एक बाप म्हणून मी कदापिही सहन करू शकत नाही. मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत गद्दारी केली. आता ते बीजेपीसोबत देखील गद्दारी करणार आहेत. माझे त्यांच्याकडे करोडो रुपये बाकी आहेत. ते जर देवाला मानत असतील तर त्यांनी देवाची शपथ घेऊन सांगावे की, माझे त्यांच्याकडे किती पैसे बाकी आहेत? गणपत गायकवाडचे एवढे पैसे खाऊनसुद्धा ते माझ्याविरुद्धच काम करत आहेत, असा आक्षेप घेत आता कोर्टाचा जो निर्णय असेल तो मला मान्य आहे, असेही त्यांनी सांगितले.