Join us  

‘आपला दवाखाना’त उपचार घेणारे सात लाखांवर; १५१ ठिकाणी आहे सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 1:00 PM

लोकाभिमुख आरोग्यसेवा, १५१ ठिकाणी आहे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ लाभार्थींची संख्या सात लाखांवर पोहोचली आहे. मुंबईकर नागरिकांच्या आरोग्यसेवेत आणलेली ही योजना अतिशय लोकाभिमुख असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. 

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या  १७ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘आपला दवाखाना’ योजनेचे लोकार्पण करण्यात आले होते. महापालिका आयुक्त डॉ. इकबालसिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या निर्देशानुसार व उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेचा सातत्याने विस्तार करण्यात येत असून, सध्या १५१ ठिकाणी दवाखाने कार्यरत आहेत.

ही योजना सुरू झाल्यानंतर प्रारंभी एक लाख लाभार्थींची संख्या ३० नोव्हेंबर २०२२ रोजी पूर्ण झाली होती. त्यानंतर ७ जानेवारी २०२३ रोजी दोन लाख, ३ फेब्रुवारी २०२३ रोजी तीन लाख, २२ फेब्रुवारी २०२३ रोजी चार लाख, ६ मार्च २०२३ रोजी पाच लाख याप्रमाणे लाभार्थी टप्पा गाठला गेला. दिनांक १ एप्रिल २०२३ रोजी संख्या सहा लाखांवर गेली होती तर अवघ्या २१ दिवसांत म्हणजे दि. २२ एप्रिल २०२३ पर्यंत आणखी एक लाख लाभार्थींनी या योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे ही संख्या आता सात लाख दोन हजार २५२वर  गेली आहे. तर, पॉलिक्लिनिक व डायग्नोस्टिक केंद्रात २८ हजार १२२ रुग्णांनी दंतचिकित्सा, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, जनरल फिजिशियन, त्वचारोगतज्ज्ञ अशा उपचार सुविधांचा लाभ घेतला आहे.

तंत्रज्ञानाचा वापरअत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे व टॅब आधारित सॉफ्टवेअरच्या माध्यमातून रुग्णांची माहिती, आजाराचा तपशील नोंदविला आहे. पर्यावरणपूरक काम होत आहे, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे.

  ‘आपला दवाखाना’ योजनेद्वारे सहा लाख ७४ हजार १३० रुग्णांनी मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार यासह रक्त चाचण्यांची सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे.   याव्यतिरिक्त क्ष-किरण (एक्स-रे), सोनोग्राफी इत्यादी चाचण्यांकरिता पॅनलवरील डायग्नोस्टिक केंद्रांद्वारे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दरात संबंधित वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्याचबरोबर विशेषतज्ज्ञांच्या सेवादेखील पॉलिक्लिनिक व डायग्नोस्टिक सेंटरद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे.

टॅग्स :हॉस्पिटलमुंबई