Join us

लस न घेणाऱ्या कोरोनाग्रस्तांना काळाने गाठले; धक्कादायक आकडेवारी आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 7:02 AM

११ महिन्यांतील ४,५७५ कोविड मृत्यूंत ९४ टक्के रुग्णांनी घेतला नव्हता लसीचा एकही डोस

मुंबई :  कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला १६ जानेवारी रोजी एक वर्ष पूर्ण होणार आहे. अजूनही मुंबईसारख्या मेट्रो शहरांत लसीकरणाविषयी गैरसमज, अफवा असल्याने काही मुंबईकर लसीकरणापासून वंचितच आहेत. नुकतीच मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार,  फेब्रुवारी २०२१ ते जानेवारी २०२२ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत शहर उपनगरात झालेल्या एकूण कोरोना मृत्यूंपैकी ९४ टक्के रुग्णांनी लसीचा एकही डोस घेतलेला नव्हता, तर केवळ सहा टक्के रुग्ण पूर्ण लसवंत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.

मुंबईत या कालावधीत ४ हजार ५७५ कोरोना रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे. त्यापैकी ४ हजार ३२० रुग्णांनी लस घेतली नव्हती. तर २२५ जणांचा ब्रेक थ्रू संसर्गाने बळी गेला आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, समाजातील विविध घटकांमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून लस साक्षरता करण्याचा पालिका सातत्याने प्रयत्न करीत आहे. तरीही लसीविषयीची भीती काही प्रमाणात आहे, असे या नोंदीतून दिसून आले आहे. 

लसीकरणानंतर कोरोना मृत्यूंच्या प्रमाणात कमालीची घट झाली आहे. विशेषतः सहव्याधी असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये मृत्यूंचे प्रमाण लसीकरणानंतर कमी झाल्याचे दिसले. नुकतेच पालिका आय़ुक्तांनी दिलेल्या माहितीत, सद्यस्थितीत ९६ टक्के ऑक्सिजनवर असणारे रुग्ण हे लस न घेतलेले असल्याचे म्हटले आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या