Join us

राज्यात उपचाराधीन रुग्ण दोन लाखांच्या पुढे, दिवसभरात २४ हजारांहून अधिक नवीन रुग्णांचे निदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात सोमवारी दिवसभरात २४ हजार ६४५ नवीन काेराेना रुग्णांचे निदान झाले असून ५८ मृत्यूंची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात सोमवारी दिवसभरात २४ हजार ६४५ नवीन काेराेना रुग्णांचे निदान झाले असून ५८ मृत्यूंची नोंद झाली. चिंतेची बाब म्हणजे, उपचाराधीन रुग्णांच्या संख्येने दोन लाखांचा टप्पा ओलांडला असून सध्या २ लाख १५ हजार २४१ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आऱोग्य विभागाने दिली.

राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या २५ लाख ४ हजार ३२७ झाली असून बळींचा आकडा ५३ हजार ४५७ झाला आहे. दिवसभरात १९ हजार ४६३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत २२ लाख ३४ हजार ३३० रुग्णांनी कोरोनावर मात केली. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.२२ टक्के झाले असून मृत्युदर २.१३ टक्के आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ८४ लाख ६२ हजार ३० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.५६ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १० लाख ६३ हजार ७७ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ११ हजार ९२ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

आठवड्याभरात सक्रिय रुग्णांत ८४ हजार ६९४ ने वाढ

राज्यात १५ मार्च रोजी सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख ३० हजार ५४७ इतकी होती, हे प्रमाण आठवड्याभरात वेगाने वाढून २२ मार्च, सोमवारी ही संख्या २ लाख १५ हजार २४१ झाली. मागील आठवड्याभरात राज्यातील सक्रिय रुग्णसंख्येत ८४ हजार ६९४ ने वाढ झाली आहे. यापूर्वी, ११ मार्च रोजी राज्यात सक्रिय रुग्णांच्या संख्येने १ लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला. ११ मार्च रोजी राज्यात १ लाख ६ हजार ७० रुग्ण उपचाराधीन होते.

* मुंबईत काेराेनाचे ३ हजार २६० नवे रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : करोना रुग्णवाढीचा उच्चांक कायम असून शहरात सोमवारी ३ हजार २६० रुग्णांचे नव्याने निदान झाले. मुंबईत संसर्ग प्रसार वेगाने होत असून रुग्णदुपटीचा कालावधी ९७ दिवसांवर आला आहे. सोमवारी मुंबईत १० काेरोनाबाधितांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये आठ जण ६० वर्षांवरील होते, तर उर्वरित दोन रुग्ण ४० ते ६० वयाेगटातील आहेत. मुंबईत कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ३ लाख ६५ हजार ९१४ झाली असून बळींचा आकडा ११ हजार ५९२ आहे. १५ ते २१ मार्चपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.६९ टक्के असल्याची नोंद आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनाच्या ३७ लाख ३० हजार ४५० चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. शहरात सध्या २५ हजार ३७२ रुग्ण उपचाराधीन असून बरे झालेल्या रुग्णांचा दर ९० टक्के आहे. सोमवारी १३२३ रुग्ण बरे होऊन घरी परतले, तर आतापर्यंत एकूण ३ लाख २८ हजार ३१ रुग्णांनी कोरोनावर मात केली. मागील चोवीस तासांत बाधितांच्या संपर्कातील १७ हजार १७० जणांचा शोध घेण्यात आला. शहरात सध्या ४० गृहसंकुले रुग्ण आढळल्याने प्रतिबंधित आहेत, तर प्रतिबंधित चाळी आणि झोपडपट्ट्यांची संख्या ३१६ वर गेली आहे.

* रुग्ण दुपटीच्या कालावधीतील घट चिंताजनक

१५ मार्च रोजी मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा काळ १६५ दिवसांवर होता, तर आठवड्याभरात यात घट होऊन ताे ९७ दिवसांवर आला. शहर, उपनगरात एक महिन्यापूर्वी म्हणजेच २२ फेब्रुवारी रोजी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३२१ दिवस होता. शिवाय संसर्गाचे प्रमाणही नियंत्रणात होते, मात्र मागील आठवड्याभरात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे.

आठवड्याभरात २१ हजार ९६७ रुग्णांचे निदान

दिनांकदैनंदिन रुग्ण

२२ मार्च३ हजार २६०

२१ मार्च३ हजार ७७५

२० मार्च२ हजार ९८२

१९ मार्च३ हजार ६२

१८ मार्च२ हजार ८७७

१७ मार्च२ हजार ३७७

१६ मार्च१ हजार ९२२

१५ मार्च१ हजार ७१२

..................................