Join us  

औषधाेपचारांसह सकारात्मक विचारांनी काेराेनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 4:07 AM

नियमांचे पालन करा, वाहतूक पाेलीस वाकचाैरे यांचे आवाहनमुंबई : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दररोज लाखो ...

नियमांचे पालन करा, वाहतूक पाेलीस वाकचाैरे यांचे आवाहन

मुंबई : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दररोज लाखो जणांना कोरोनाची लागण होत आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे आकडे वाढत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, असे असले तरी देशासह राज्यात व शहरात आता कोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. नागरिकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार घेतल्यास कोरोना बरा होतो, हे यातून स्पष्ट होते. मुंबईतील वाहतूक पोलीस संदीप वाकचौरे याचे एक चांगले उदाहरण आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार व सकारात्मकतेच्या बळावर वाकचौरे यांनी कोरोनावर मात केली आहे.

वाहतूक पोलीस असणारे संदीप वाकचौरे हे अणुशक्तीनगर वाहतूक विभागात कार्यरत आहेत. त्यांना काही महिन्यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. ते कोरोनाबाधित झाल्याने त्यांच्या घरात काळजीचे वातावरण होते. परंतु खचून न जाता व न डगमगता कोरोनावर मात करण्याचा निश्चय त्यांनी केला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार घेत कोरोनावर मात केली. घाबरून जाऊ नका, संकटे येतच असतात. काेराेनाच्या संकटाला हरविण्यासाठी सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन करा. काेराेना झाल्यास काळजी करत बसण्यापेक्षा तातडीने औषधाेपचार घ्या, मग पाहा, काेराेनाला हरवणे साेपे आहे, असे ते म्हणाले.

* सतत आशावादी राहा

संदीप वाकचौरे म्हणाले की, जुलैमध्ये त्यांना तीन दिवस खोकला, ताप होता. त्यानंतर कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. मरोळ आयसोलेशन सेंटरमध्ये ८ दिवस उपचार घेऊन १५ दिवस क्वारंटाईन झालाे. उपचाराअंती पुढील अहवाला निगेटिव्ह आल्यानंतर कामावर रुजू झालो. कोरोनाचा काळ सर्वांसाठी कठीण असला तरी आपल्या आरोग्य यंत्रणेवर सर्वांनी विश्वास ठेवायला हवा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळीच औषधाेपचार घेतल्यास कोरोना बरा होतो. नागरिकांनी घरात राहून स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. कोरोनाला घाबरून जाऊ नका, तसेच आपला आजार व दुखणे अंगावर काढू नका. सतत आशावादी आणि सकारात्मक राहा, असेही ते म्हणाले.

--------------------------