लालबागचे रहिवासी संदेश राणे यांचा यशस्वी लढा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाची लागण झाल्यावर शरीरापेक्षा मानसिक भीतीमुळे खचायला होते. परंतु, वेळेवर निदान आणि सकारात्मक विचारांनी कोरोनावर मात करणे सोपे होते, असा संदेश कोरोनामुक्त झालेले लालबागचे रहिवासी संदेश राणे देतात. दोन आठवड्यांहून अधिक काळ रुग्णालयात कोरोनाशी संघर्ष केल्यानंतर केवळ कुटुंबीयांच्या सकारात्मक विचारांमुळे हे शक्य झाल्याचे ते आवर्जून सांगतात.
लालबाग येथील संदेश श्रीराम राणे (४५) यांना १७ सप्टेंबरला कोरोनाची लागण झाली होती, त्यावेळेस मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात १५ दिवसांहून अधिक काळ उपचार घेतले. रुग्णालयात उपचार घेत असताना मानसिक ताणाला सामोरे जावे लागले होते, परंतु त्या काळात कुटुंबातील सदस्यांनी मनोधैर्य वाढविले. कार्यालयातील सदस्यांनीही धीर दिला. रुग्णालयात असताना सातत्याने कुटुंबातील सदस्यांशी बोलून बरे वाटायचे, घरी जाण्याची ओढ सतत वाढायची. शिवाय, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचेही या काळात सहकार्य मिळाले. त्यांच्याकडून वारंवार प्रकृतीची विचारपूस व्हायची, त्यामुळे आपुलकीची भावना वाटायची. दोन आठवड्यांतला प्रत्येक दिवस हा एक वर्षासारखा वाटत होता, असे राणे यांनी नमूद केले.
* आईलाही झाली लागण
अखेर १५ दिवसांनंतर रुग्णालयातून घरी जाण्याची संमती मिळाल्यानंतर आकाश ठेंगणे झाले होते, कधी एकदा कुटुंबातील सदस्यांना पाहतोय, असे वाटत होते. घरी आल्यानंतर विलगीकरणाचे नियम पाळले. घरी आल्यानंतर दीड महिन्यानंतर आईलाही कोरोनाची लागण झाली. आईचे वय ६५ असल्याने अधिक धाकधूक वाटत होती. तिच्यावरही नायर रुग्णालयात उपचार करण्यात आले. या वयातही मनोबल राखून तिने डोळ्यांना न दिसणाऱ्या कोरोनासारख्या विषाणूवर मात मिळविली, हे केवळ सकारात्मक विचार आणि ऊर्जेमुळे शक्य झाले.
* बहिष्कृत करू नका, मानसिक आधार द्या
कोरोनासारख्या विषाणूवर उपचार करता येतात. मात्र, त्याचे वेळीच निदान झाले पाहिजे. त्याकरिता, आपल्या आरोग्य यंत्रणेवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. डॉक्टर, वाॅर्ड बॉय़, परिचारिका यासारखे अनेक घटक अहोरात्र राबत आहेत, ही यंत्रणा आता थकली आहे. त्यामुळे त्यांचाही विचार करून शासनाने जाहीर केलेल्या नियमांचे पालन करणे हे आपले कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे, कुटुंबात किंवा आपल्या आजूबाजूला कोणालाही कोरोनाची बाधा झाल्यास त्यांना बहिष्कृत न करता त्यांना मानसिक आधार देणे महत्त्वाचे आहे, असा मोलाचा सल्ला राणे यांनी दिला.
--------------------