दहशतवाद मिटवण्यासाठी महावीर, बुद्धांच्या मार्गावर चला
By Admin | Published: August 4, 2015 09:05 PM2015-08-04T21:05:05+5:302015-08-04T21:30:42+5:30
दहशतवाद मिटवण्यासाठी महावीर आणि गौतम बुद्ध यांनी दाखवलेल्या मार्गावर चला, असे विचार लोकमत समूहाचे अध्यक्ष आणि खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केले.
विजय दर्डा यांचे मत : अमृता फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘निर्जरा भक्ती वृंद’ पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई : दहशतवाद मिटवण्यासाठी महावीर आणि गौतम बुद्ध यांनी दाखवलेल्या मार्गावर चला, असे विचार लोकमत समूहाचे अध्यक्ष आणि खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केले. कफ परेड येथील विवांता हॉटेलमध्ये पार पडलेल्या प्रीती जैन यांच्या ‘निर्जरा भक्ती वृंद’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ््यात ते बोलते होते.
दर्डा म्हणाले की जैन धर्मात जन्माला आलेला व्यक्ती जैन नसतो, तर जैन धर्माने दिलेल्या शिकवणीचे अनुकरण करणारा व्यक्ती खऱ्या अर्थाने जैन ठरतो. म्हणूनच दहशतवादाला विरोध करणारे आणि जगाला अहिंसा, शाकाहार आणि माणुसकीची शिकवण देणारे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम हे आचरणाने जैनच होते. प्रीती जैन यांनी लिहिलेल्या पुस्तकातून भक्ती आणि संगीताची सांगड घातली जाईल आणि त्यातून विचारांचे नवनिर्माण होईल, असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. भजन संकलनावर आधारित पुस्तकाचे कौतुक करताना त्यांनी सुस्वरात पूर्ण भजन गाऊन सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला.
त्या म्हणाल्या की मुंबईतील धकाधकीच्या जीवनात थोडा वेळ भक्तीसाठी दिला पाहिजे. या पुस्तकात दिवंगत ज्योत्स्ना दर्डा यांच्या भजनांचा समावेश केल्याने त्यांनी आनंदही व्यक्त केला.
पुस्तकाच्या लेखिका प्रीती जैन नैनुतिया म्हणाल्या की, पुस्तकात जैन धर्मातील शिकवण आणि तत्त्वांचा समावेश केलेला आहे. मोक्षापर्यंत पोचण्याचा मार्ग याच माध्यमातून मिळतो. या पुस्तकाच्या निर्मितीचे श्रेय त्यांनी आई-वडिलांच्या संस्कारांना दिले. यावेळी प्रीती जैन यांचे पती पराग जैन यांच्यासोबत खास मेरठवरून त्यांच्या आई मधुर जैन व वडील सुरेंद्र कुमार जैन हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रमावेळी सुप्रसिद्ध गायक रूपकुमार राठोड यांच्या पत्नी सोनाली यांनी दिवंगत ज्योत्स्ना दर्डा यांच्या ‘महावीर नमन’ या सीडीतील भजनाचे गायन करीत सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. तर ‘फ्रेंडशिप डे’च्या निमित्ताने ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक कल्याणजी-आनंदजी जोडीतील आनंदजी शहा यांनी दर्डा यांच्यासाठी ‘मेरा जीवन कोरा कागज...’ हे गीत गायले. तसेच गायक रूपकुमार राठोड आणि ज्येष्ठ कवी नारायण अग्रवाल दासनारायण यांनी या भजनाचे संकलन असलेल्या पुस्तकाचे रूपांतर आॅडिओ रूपात करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमात न्यायमूर्ती कमल तातेड, माहिती आयुक्त डी. के. जैन, माजी अतिरिक्त महासंचालक पी. के. जैन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन नैनुतिया, माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया, जैन इंटरनॅशनल ट्रेड आॅर्गनायझेशनचे अध्यक्ष राकेश मेहता, ए. के. जैन, भाजपा उपाध्यक्ष किरीट भन्साली, वल्लभ भन्साली, जयेंद्र शहा,आशिष आणि संगीता जैन, राजीव श्रीश्रीमाळ, सुनीत आणि पूर्वा कोठारी, कांतीलाल कोठारी, अनुजा छाजेड, रिलायन्सचे आनंद जैन, उद्योगपती मोतीलाल ओस्वाल, उद्योगपती सुभाष रुणवाल, कस्टम अॅन्ड सर्व्हिस टॅक्स चीफ कमिशनर सुशील सोलंकी यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)