कोरोनाच्या भीतीवर खरेदीच्या लगबगीची मात; गणपतीच्या खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 04:44 AM2020-08-20T04:44:14+5:302020-08-20T04:44:32+5:30
मुंबई पालिकेने सर्व छोट्यामोठ्या गोष्टींसाठी विस्तृत नियमावली तयार केली आहे.
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात दुकाने सुरू ठेवण्यावर असलेली बंधने आता शिथिल करण्यात आली आहेत. त्यातच अगदी दोन दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवामुळे बाजारपेठा गजबजून गेल्या आहेत. कोरोनाच्या त्रासाची भीती लोकांच्या मनात असली तरी त्यावर गणपतीच्या खरेदीने सध्या मात केली आहे. त्यामुळे दादर भागात तर कोरोनापूर्व काळात व्हायची तशीच गर्दी दिसत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मुंबई पालिकेने सर्व छोट्यामोठ्या गोष्टींसाठी विस्तृत नियमावली तयार केली आहे. वॉर्ड आॅफिसेसना त्यासाठी तयार राहण्याचे आदेशही दिले आहेत.
गेले दोन ते तीन दिवस मुंबईकरांच्या खरेदीची प्रमुख केंद्रे असलेल्या दादर, परळ, भायखळा या भागात गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र आहे. सण जरी साध्या पद्धतीने साजरा होत असला तरी लोकांचा उत्साह मात्र दरवर्षीप्रमाणेच असल्याचे लक्षात येते. दादर येथे फुल मार्केट, कपड्यांची दुकाने, पूजेच्या साहित्याची दुकाने, मिठाईची दुकाने, शोभेच्या वस्तूंची दुकाने गजबजलेली आहेत. फुल मार्केटमध्ये पाय ठेवायलाही जागा नाही. त्यात पावसाने काहीशी उसंत घेतल्याचा फायदा मुंबईकरांनी उठवला नसता तरच नवल.
>बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी
मुंबईत दररोज कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यात मुंबई महापालिकेचा जी उत्तर विभाग म्हणजेच दादर परिसर हा कोरोना रुग्णांच्या संख्येत मुंबईत तिसऱ्या क्रमांकावर आहे. असे असले तरीदेखील नागरिकांनी कोरोनाचे भयाला मागे सारत बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू केली आहे. याचप्रमाणे छबिलदास मार्ग, रानडे मार्ग, डिसिल्वा मार्ग, जावळे मार्ग व कवी केशवसुत उड्डाण पुलाखाली फेरीवाल्यांनीही आता बस्तान बसवण्यास सुरुवात केली आहे. मुंबईकरांनी ‘मिशन बिगिन अगेन’ मनावर घेत खरेदीचा जोरदार सपाटा लावल्याचे चित्र सध्यातरी आहे.
>कोरोनाच्या सावटात ठाणेकरांनी गर्दीत केली खरेदी
ठाणे : गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असतानाही ठाणेकर बाजारपेठेत गर्दी करून खरेदी करीत आहेत. तोंडाला मास्क लावून ती केली जात असली, तरी सोशल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा उडाला होता.
शनिवारी गणरायाचे आगमन होणार आहे. कोरोनामुळे दुकाने १५ आॅगस्टपासून दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत खुली झाल्याने आणि त्याआधी दुकाने बंद असल्याने खरेदीसाठी रविवारपासून बुधवारपर्यंत गणेशभक्तांची झुंबड उडालेली दिसली. होलसेल आणि किरकोळ बाजारात भक्तांची खरेदी सुरू होती. बुधवारीही ठाण्याची मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जांभळी मार्केट, स्टेशन रोड येथे गर्दीच गर्दीचे चित्र दिसून आले. खरेदी करताना कोरोनाची भीती नाहीशी झाली होती की काय, असे वाटत होते.