मुंबई : महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्यावरील (जीएमएलआर) नाहुर रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात येणार आहे. मात्र या पुलाच्या बांधकामात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (एमएसईबी) ओव्हरहेड हाय टेन्शन वायरचा अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे या ओव्हरहेड वायर काढून आता जमिनीखालून टाकल्या जाणार आहेत. हे काम एमएसईबीच्या माध्यमातून होणार असले तरी महापालिकेला साडेतीन कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. त्यानंतरच ओव्हरहेड वायर बाजूला होऊन या प्रकल्पाचा मार्ग मोकळा होणार आहे.जीएमएलआर प्रकल्पामुळे पूर्व ते पश्चिम उपनगरातील प्रवास सुसाट होणार आहे. मात्र या प्रकल्पाच्या मार्गात आतापर्यंत अनंत अडचणी आल्या आहेत. आता ओव्हरहेड वायरने या प्रकल्पाची वाट अडवली आहे. या मार्गावरील नाहूर रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाच्या उतार मार्गाचे विस्तारीकरण आणि पुनर्बांधणी करण्यासाठी ठेकेदाराची नेमणूक करून कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या पुलाच्या कामाला नोव्हेंबर २०१८ पासून सुरुवात झाली आहे. परंतु, पुलाच्या कामामध्ये एमएसईबीची २२ केव्ही क्षमतेची ओव्हरहेड हाय टेन्शन वायर येत असल्याने ती बाजूला करणे आवश्यक आहे.याबाबत महापालिकेने एमएसईबीबरोबर चर्चा केल्यानंतर त्यांनी ओव्हरहेड हाय टेन्शन वायर ही भूमिगत केबलमध्ये १०० टक्के डेडिकेटेड डिस्ट्रीब्युशन फॅसिलिटी योजनेअंतर्गत करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र त्यासाठी तीन कोटी ४४ लाख रुपये एवढा खर्च होणार आहे. ही रक्कम जमा केल्यानंतर या केबलचा अडथळा दूर करण्यात येणार आहे. भांडुप येथील एमएसईबीचे प्रमुख अभियंता यांनी या कामाचा अंदाजित खर्च महापालिकेला कळवला आहे. ही रक्कम मिळाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे.>प्रकल्पाचा खर्च तीनपट वाढला...अमेरिकेतील सल्लागार कंपनीने १९६३ मध्ये गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता बांधण्याची शिफारस केली होती. २०१२ मध्ये या प्रकल्पावर काम सुरू झाले त्या वेळेस १३०० कोटी रुपये खर्चाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र विविध परवानग्या मिळवत या प्रकल्पाला प्रत्यक्षात उतरविण्यात बराच कालावधी लोटला. परिणामी या प्रकल्पाचा खर्च आता ४६७८ कोटींवर पोहोचला आहे. जीएमएलआर १४ कि.मी. असणार आहे. सहापदरी मार्ग, ४.७ कि.मी. चे भुयारी मार्ग असणार आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ४.७ कि.मी.चा बोगदा काढण्यात येणार आहे. तर फिल्मसिटीतून १.६ कि.मी.चा ‘कट अॅण्ड कव्हर’ बोगदा काढण्यात येईल. या मार्गामुळे गोरेगाव ते मुलुंड हा सध्या तास-दीड तासाचा प्रवास अवघ्या १५ ते २० मिनिटांमध्ये होणार आहे.
‘जीएमएलआर’च्या मार्गात आता ओव्हरहेड वायरचा अडसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2020 12:49 AM