लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायरची देखभाल दुरुस्ती करताना अनेकदा विद्युत दुर्घटनांमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर, काही जण जखमी झाले आहेत. अशा दुर्घटनांत रेल्वे कर्मचाऱ्यांना शॉक लागू नये आणि जीवितहानी होऊ नये, यासाठी विद्युतरोधक बूट आता कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे. त्यामुळे दुर्घटना टाळता येतील, असा दावा मध्य रेल्वेने केला आहे.
मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकरिता मलेशियातून विद्युतरोधक बूट खरेदी करण्यात आले आहेत. हे बूट घालून काम करत असताना विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्यावरही कर्मचारी सुरक्षित राहतील, असा दावा प्रशासनाने केला आहे.
मुंबई विभागातून रोज १ हजार ८१० लोकल फेऱ्या चालविल्या जातात. दररोज रूळ, सिग्नल आणि ओव्हर हेड वायरची दुरुस्ती केली जाते. ओव्हर हेड वायरच्या तपासणीसाठी टॉवर वॅगनचा वापर करण्यात येतो. येथे ट्रॅक्शन डिस्ट्रीब्युटर कर्मचारी काम करतात. ओव्हर हेड वायरच्या संपर्कामुळे कर्मचाऱ्यांना विजेचा धक्का बसतो. यात त्यांचा मृत्यू होतो. किंवा ते जखमी होतात. त्यामुळे आता त्यांच्या सुरक्षेसाठी विद्युतरोधक बूट खरेदी करण्यात आले आहेत.
मध्य रेल्वेने हे बूट खास मलेशियाहून आणले आहेत. भारतीय रेल्वेवरील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे. इलेक्ट्रिकल उपकरणांजवळ काम करणाऱ्या तंत्रज्ञांसाठी हे बूट आवश्यक सुरक्षा उपकरणे आहेत. मध्य रेल्वेच्या विद्युत विभागात १ हजार ७०० कर्मचारी काम करत आहेत. सुमारे १ हजार ३०० कर्मचाऱ्यांना बूट दिले जातील. रेल्वेने विद्युतरोधक ११ बूटांचे जोड खरेदी केले. बुटांच्या जोडीची किंमत २२ हजार ५०० रुपये इतकी आहे.