बोर्ली-मांडला : भारत संचार निगम लिमिटेड कंपनीच्या मुरूड तालुक्यातील बोर्ली मांडला विभागातील सेवेचा बोजवारा उडाला आहे. दूरसंचार निगमच्या सुमार सेवेमुळे राष्ट्रीयकृत बँकेसहित शासकीय यंत्रणेची कामे ठप्प आहेत. बीएसएनएलची सेवा विस्कळीत होत असल्याने त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे.आॅप्टीकल फायबर लाइनच्या वाहिन्या चोरीच्या प्रमाणात वाढ झाल्याने हे प्रकार घडत असल्याचे सांगितले जात आहे. तर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाची कामे सुरू असल्याने रस्त्यालगत असलेल्या फायबर आॅप्टीकल लाइन्स तुटत असल्यामुळे भारत संचारची सेवा खंडित होत असल्याचे कारणही बऱ्याचवेळा दूरध्वनी कार्यालय अलिबाग येथून देण्यात आले आहे.दुर्गम भागाला जोडणारी यंत्रणा म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून भारत संचार निगम कार्य करीत आहेत. काही महिन्यांपासून दूरध्वनी यंत्रणा, भ्रमणध्वनी सेवा खंडित होण्याचे प्रकारात वाढ झाली आहे. बोर्ली मांडला विभागात महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचा विद्युत पुरवठा खंडित झाला की, अर्ध्या तासातच भारत संचारची भ्रमणध्वनी व दूरध्वनी सेवा ही ठप्प होते. मात्र खासगी कंपन्यांची सेवा सुरळीत चालत असल्याने ग्राहक वर्ग त्याकडे आकर्षित होत आहे. वारंवार ठप्प होणाऱ्या या सेवेमुळे त्याचा परिणाम ग्राहकांवर झाला असून ५० टक्क्यांच्या आसपास ग्राहकांनी आपला मोर्चा खासगी कंपन्यांकडे वळविला आहे. (वार्ताहर)
दूरसंचार सेवेचा बोजवारा
By admin | Published: June 11, 2015 10:53 PM