मध्य रेल्वे मार्गावर आज रात्रकालीन ब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 06:33 AM2019-10-18T06:33:09+5:302019-10-18T06:34:10+5:30
डोंबिवली स्थानकातील पुलाचे तोडकाम
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील दिवा ते कल्याण स्थानकांदरम्यान १८ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबरला मध्यरात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे कोपर आणि ठाकुर्ली या स्थानकांवर लोकल थांबा नसेल.
ब्लॉकवेळी डोंबिवली स्थानकातील कल्याण दिशेकडील पादचारी पुलाचे तोडकाम करण्यात येणार आहे. या कामामुळे मध्य
रेल्वे मार्गावरील लोकलच्या मार्गात बदल केला जाणार आहे. दिवा ते कल्याण दरम्यान दोन्ही दिशेकडील जलद मार्गावर १८ व १९ आॅक्टोबर रोजी रात्री १.१० ते पहाटे ३.४० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. तर कल्याण ते डोंबिवली स्थानकांदरम्यान ५
व्या तसेच ६ व्या रेल्वे मार्गावर रात्री १.१० ते पहाटे ५ वाजेपर्यंत काम करण्यात येईल. १९ व २० आॅक्टोबर रोजी रात्री १ ते पहाटे ३.३० वाजेपर्यंत दिवा ते कल्याण दरम्यान सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या धिम्या मार्गावर, तर कल्याण दिशेकडील धिम्या मार्गावर रात्री
१ ते पहाटे ५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकवेळी डोंबिवली स्थानकातील कल्याण दिशेकडे नवीन पूल बांधण्यासाठी तोडकाम करून जुन्या पुलाचा सांगाडा काढण्यात येणार आहे.
रात्रकालीन ब्लॉकदरम्यान दिवा स्थानकाहून कल्याण दिशेकडे जाणाºया धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावरून चालविण्यात येतील. मध्यरात्री १२.३९, १२.५३, १.०२, १.१३, १.२३ आणि १.३३ वाजताच्या लोकल दिव्याहून जलद मार्गावरून चालविण्यात येतील. परिणामी
या लोकल कोपर आणि ठाकुर्ली स्थानकात थांबणार नाहीत. ब्लॉक कालावधीत कल्याण दिशेकडील एक्स्प्रेस १५ ते २० मिनिटे उशिराने धावतील, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.