सरकार पाडून दाखवाच; शिवसेनेचे भाजपाला आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 01:27 AM2020-07-13T01:27:18+5:302020-07-13T01:28:39+5:30
काही लोक मुहूर्त काढून बसले आहेत. काही कुडमुडे जोशी आहेत त्यांच्याकडे. मध्येच असे काही तरी सरकार पडणार असल्याचे बोलत असतात. त्यांचा हा मुहूर्त साडेतीन मुहुर्तांपैकी एक नाही.
मुंबई : मध्य प्रदेशापाठोपाठ राजस्थानमध्येही भाजपने सरकार पाडण्याच्या हालचाली सुरू केल्यानंतर आता महाराष्ट्रातही आॅपरेशन लोटस होणार अशी चर्चा असताना शिवसेनेने मात्र महाविकास आघाडी सरकार पाडून दाखवाच, असे आव्हान भाजपला दिले आहे. तुमचे आॅपरेशन लोटस असेल तर आम्ही आॅपरेशन लोटांगण सुरू करून तुम्हाला धडा शिकवू, असा इशारा शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी दिला आहे.
काही लोक मुहूर्त काढून बसले आहेत. काही कुडमुडे जोशी आहेत त्यांच्याकडे. मध्येच असे काही तरी सरकार पडणार असल्याचे बोलत असतात. त्यांचा हा मुहूर्त साडेतीन मुहुर्तांपैकी एक नाही. त्यांनी जर मुहूर्त काढला असेल तर आमचीही गटारी आहेच की. आम्ही कोकणातील लोक आहोत, गटारी कशी असते दाखवून देऊ. हा महाराष्ट्र आहे. हे काही गोवा आणि मध्य प्रदेश नाही. तुमचं हे आॅपरेशन कमळ, लोटस इथे चालणार नाही, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
सत्ता आणि पैशाचा माज असता कामा नये. त्यामुळे सरकार पाडण्याच्या भ्रमातून बाहेर पडा. प्रत्येकाच्या पायाखाली सतरंजी असते आणि कुणाला तरी ही सतरंजी खेचता येत असते, हे लक्षात ठेवा. लोकशाही अस्थिर करू पाहणाऱ्यांना आता आणीबाणीवर बोलण्याचा आणि प्रवचन झोडण्याचा अधिकार राहिला नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.
राज्य अस्थिर करण्याचा अजेंडा राबवू नका. राजकारण अस्थिर आणि चंचल असते, हे लक्षात घ्या. आम्ही राज्य वाचवण्याचं काम करत आहोत. तुम्ही राज्य बिघडवू नका. देशावर मोठे संकट आले आहे. संकटातून आपण बाहेर पडलो तर आम्हीच तुम्हाला सरकार पाडण्याचा मुहूर्त देऊ, असे राऊत म्हणाले.
स्वत: मारून घ्यायचं आणि स्वत:च रडायचं ही एक नवीन पद्धत आहे. कोणी सरकार पाडत नाही. ही पद्धत अवलंबिली तर स्वत:च्या अपयशापासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवता येते. आपणच कांगावा करायचा; सरकार पाडताहेत, सरकार पडताहेत म्हणायचं आणि त्याच्यावर मुलाखती करायच्या. हे सगळं कोरोनाबाबतचे अपयश लपवण्यासाठी चाललं आहे, त्यापेक्षा कोरोनाकडे त्यांनी लक्ष दिलं तर अधिक बरे होईल.
- देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते