मुंबई : मध्य रेल्वेच्या चार गाड्यांना विस्टाडोम कोच जोडण्यात आला. त्याला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. गेल्या चार महिन्यांत ३१ हजार ८२१ प्रवाशांनी व्हिस्टाडोम डब्यातून प्रवास करून पर्यटनाच्या आनंद घेतला असून, मध्य रेल्वेने यातून ३.९९ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
व्हिस्टाडोम डब्यांमध्ये काचेच्या पारदर्शक छताशिवाय रुंद खिडक्या, एलईडी दिवे, फिरते आसन आणि पुशबॅक खुर्च्या, जीपीएस आधारित माहिती प्रणाली, मल्टिपल टेलिव्हिजन स्क्रीन, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ऑटोमॅटिक स्लाइडिंग कंपार्टमेंट दरवाजे यांसारखी अनेक असामान्य वैशिष्ट्ये आहेत. दिव्यांगांसाठी रुंद बाजूचे सरकते दरवाजे, सिरेमिक टाइल फ्लोअरिंग असलेली टॉयलेट, आदी व व्ह्यूइंग गॅलरीदेखील आहे.
शताब्दी एक्स्प्रेसच्या प्रवाशांनाही व्हिस्टाडोमची सफर
विस्टाडोम डबा पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसला जोडण्यात आला आहे. १२०२५ पुणे - सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेस पुण्याहून सकाळी ६ वाजता (मंगळवार वगळता) सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी २.२० वाजता सिकंदराबादला पोहोचेल. १२०२६ सिकंदराबाद - पुणे शताब्दी एक्स्प्रेस सिकंदराबाद येथून दुपारी २.४५ वाजता (मंगळवार वगळता) सुटेल आणि त्याच दिवशी (मंगळवार वगळता) रात्री ११.१० वाजता पुण्याला पोहोचेल.
- सीएसएमटी - मडगाव- सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेसच्या विस्टाडोम कोचमध्ये एप्रिल २०२२ ते जुलै २०२२ या कालावधीत ३१ हजार ८२१ प्रवाशांची नोंद असून, ३.९९ कोटी महसूलाची नोंद केली आहे.
- २०१८ मध्ये मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये विस्टाडोम डबे पहिल्यांदा जोडण्यात आले होते. या डब्यांच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे हे डबे २६ जून २०२१ पासून मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेसला जोडण्यात आले.
- प्रवाशांच्या मागणीमुळे, मध्य रेल्वेचा तिसरा विस्टाडोम कोच १५ ऑगस्ट २०२१ पासून डेक्कन क्वीनला जोडण्यात आला आणि २५ जुलै २०२२ रोजी चौथा विस्टाडोम कोच प्रगती एक्स्प्रेसला जोडण्यात आला.
- आता पुणे-सिकंदराबाद शताब्दीला विस्टाडोम कोच जोडण्यात आला आहे. १० ऑगस्ट २०२२ पासून व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आलेली पुणे - सिकंदराबाद शताब्दी मध्य रेल्वेवरील पाचवी एक्स्प्रेस असेल. या सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसच्या विस्टाडोममधून प्रवास करणाऱ्या पर्यटकांना उजनी बॅकवॉटर आणि भिगवणजवळील धरणाचा आनंद घेता येईल.