Join us

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ओवेसींनी दिलं 'ग्यान'... खोचकपणे विचारलं, 'समजलं का?'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 6:21 PM

उद्धव ठाकरे यांच्या धर्मनिरपेक्षतेवरच्या माैनावर खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विटरवरुन टीका केली आहे.

मुंबई : शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्या शपथविधीनंतर त्यांना अनेकांनी ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या. शपथविधीनंतर लगेचच ठाकरे यांनी कॅबिनेटची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेमध्ये महाविकास आघाडीमधल्या किमान समान कार्यक्रमामधील ''धर्मनिरपेक्षतेवरुन'' एका पत्रकाराने प्रश्न केला. त्या प्रश्नाला उत्तर देण्याचे ठाकरे यांनी टाळले. यावर आता एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ट्विटकरुन त्यांनी ठाकरे यांना धर्मनिरपेक्षतेचा अर्थ सांगितला आहे. 

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच उद्धव ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर कॅबिनेटची पहिली बैठक घेतली. यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी एका पत्रकाराने किमान समान कार्यक्रमातील ''धर्मनिरपेक्ष'' शब्दाबाबत विचारणा केली. 'आता शिवसेना धर्मनिरपेक्ष झाली का ?' असेही त्या पत्रकाराने ठाकरे यांना विचारले. यावर ठाकरे यांनी 'धर्मनिरपक्षता म्हणजे काय ?' असा प्रतिप्रश्न पत्रकाराला केला. त्यावर 'मी तुम्हाला प्रश्न विचारला असून तुम्हीच त्याचे उत्तर द्या' असे पत्रकाराने सांगितले. यावेळी या प्रश्नाचे उत्तर देण्याचे ठाकरे यांनी टाळले. तसेच यात भुजबळांनी ठाकरे यांची बाजू सावरत संविधानातच धर्मनिरपेक्ष शब्द असल्याचे त्यांनी सांगितले. 

यावर आता ओवेसी यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ''धर्मनिरपेक्ष हा काही तत्त्वज्ञानाचा प्रश्न नाही की ज्यासाठी सखाेल चिंतनाची गरज भासेल. तुमच्याच किमान समान कार्यक्रमातील शब्दाचा जर अर्थ दुसऱ्याला विचारावा लागत असेल तर हे याेग्य नाही. तुमच्यासाठी मी ज्ञान देताे. धर्मनिरपेक्ष म्हणजे हिंदुराष्ट नाही. तसेच श्रद्धेमध्ये कुठलाही भेदभाव न करणे... समजलं का ? असा खाेचक सवाल ओवेसी यांनी ठाकरे यांना केला आहे. 

टॅग्स :उद्धव ठाकरेअसदुद्दीन ओवेसीट्विटर