ओवेसी यांची भिवंडीतील सभा रद्द; पोलिसांची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 03:47 AM2020-02-28T03:47:04+5:302020-02-28T03:47:19+5:30

एमआयएम एक पाऊल मागे

Owaisis anti CAA rally put off after request by cops | ओवेसी यांची भिवंडीतील सभा रद्द; पोलिसांची विनंती

ओवेसी यांची भिवंडीतील सभा रद्द; पोलिसांची विनंती

Next

भिवंडी : सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. असदुद्दीन ओवेसी यांची भिवंडी येथे गुरुवारी आयोजित केलेली सभा अखेर रद्द करण्यात आली. ओवेसींच्या सभेबाबत भाजप व एमआयएममध्ये गेल्या काही दिवसांपासून चांगलीच जुंपली होती.

ओवेसी यांच्या जाहीर सभेचे आयोजन भिवंडीतील टावरे स्टेडियम येथे केले होते. ही सभा उधळवून लावण्यासाठी भिवंडीतील मुख्य नाक्यांवर कार्यकर्ते उभे ठेवून ओवेसींची नाकाबंदी करण्याची भूमिका भाजपने घेतली होती. या भूमिकेनंतर एमआयएमने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन ही सभा होईलच. दम असेल त्यांनी ती रोखून दाखवावी, असे आव्हानच भाजपला दिले होते. त्यामुळे भिवंडीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले.

विशेष म्हणजे, भिवंडीतील महिलांचे २८ दिवसांपासून शाहीनबाग आंदोलन सुरू आहे. दिल्ली येथील हिंसाचारानंतर भिवंडीतील सर्व आंदोलने शांततेच्या मार्गाने सुरू आहेत. मात्र, ओवेसींच्या सभेमुळे भिवंडीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी असदुद्दीन ओवेसी यांची मनधरणी केली. त्यानंतर, ओवेसी यांनी स्वत: सभा रद्द केल्याची माहिती एमआयएमचे शहर महासचिव अमोल कांबळे यांनी गुरु वारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, खा. ओवेसींची जाहीर सभा मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता असल्याचेही कांबळे यांनी सांगितले.

शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी आपण एमआयएमच्या नेत्यांना भिवंडीतील संवेदनशीलता आणि दिल्ली हिंसाचाराबाबत माहिती देऊन सभा रद्द करण्याची विनंती केली होती. ती मान्य केल्याने सभा रद्द आहे.
- राजकुमार शिंदे, पोलीस उपायुक्त, भिवंडी

Web Title: Owaisis anti CAA rally put off after request by cops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.