मुंबई - वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकांसाठी एमआयएम आणि आम्ही एकत्र असल्याचे म्हटले आहे. 31 ऑगस्ट रोजी आम्ही याबाबत सर्वच स्पष्टीकरण देणार आहोत. 29 किंवा 30 रोजी आमची बैठक होणार आहे. त्या बैठकीनंतर आमची विधानसभा निवडणुकांसंदर्भातील भूमिका स्पष्ट होईल. मात्र, माझं असुदुद्दीन ओवैसींसोबत बोलणं झालंय. त्यानुसार, आमचं ठरलंय असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
मी हैदराबादला जाणार आहे, ओवैसी यांच्या घरातील एका दावतसाठी मी तेथे जाणार आहे, हेही खरंय. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकांसंदर्भात आमचं अगोदरच ठरलंय. मी आणि असुदुद्दीन ओवैसी याबाबतीच निर्णय घेणार आहोत. त्यामुळे, जर इतर कोणी काही बोलत असेल, तर ते स्वत:च महत्व वाढविण्यासाठी वक्तव्य करतायेत, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. तसेच, काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे, त्यामुळे त्यांनी बहुजन वंचित आघाडीसोबत यावं ही आमचीही इच्छा आहे. पण, काँग्रेस नेत्यांची भूमिका पाहूनच आम्ही निर्णय घेऊ, असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.
बहुजन वंचित आघाडी आणि एमआयएम पक्षाची पुण्यात बैठक घेण्यात आली. बैठक वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली होती. बैठकीत महाराष्ट्रातील विधानसभेच्या जागांवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. मात्र, बैठकीत जागा वाटपाचा कोणत्याही ठोस निर्णय झाला नव्हता. एमआयएम पक्षाला किती जागा हव्या आहेत आणि त्या कोणकोणत्या यावर पुण्यात प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी बहुजन वंचित आघाडी आणि एमआयएम पक्षाची एक बैठक घेण्यात आली. मागील विधानसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाने ज्या जागा लढविल्या होत्या त्यापेक्षा जास्त जागांची मागणी करण्यात आली आहे. मात्र, जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब झाला नाही. तब्बल तीन तास ही बैठक एका बंद खोलीत झाली. वंचित आघाडीकडून स्वतः प्रकाश आंबेडकर तर एमआयएम पक्षातर्फे असुदुद्दीन ओवेसी उपस्थित होते. दरम्यान, एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी 100 जागांची मागणी केल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. मात्र, याबाबत मी आणि असुदुद्दीन ओवैसी हेच अंतिम निर्णय घेतील, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.