एसीपी कार्यालयाच्या भूखंडावर लावला स्वतःच्या मालकीचा बोर्ड; चेंबूरमधील प्रकार, पोलिसांकडून गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 12:19 PM2023-10-12T12:19:42+5:302023-10-12T12:20:00+5:30
चौकशीत सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.
मनीषा म्हात्रे -
मुंबई : मुंबईत स्वतःच्या हक्काची जागा असावी असे प्रत्येकालाच वाटते. एका पठ्ठ्याने थेट एसीपी कार्यालय असलेल्या भूखंडावर स्वतःच्या मालकीचा बोर्ड लावल्याचा धक्कादायक प्रकार चेंबूरमध्ये समोर आला आहे. चौकशीत सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.
टिळकनगर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार आनंदा पाटील (४७) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. चेंबूर येथील जमीन सर्व्हे क्रमांक ३२० या भूखंडावर सहायक पोलिस आयुक्त देवनार विभागाचे कार्यालय आहे. त्याच्या बाजूला काही मोकळी पडीक जमीन आहे. १६ मे रोजी राजन गुल्हाने याने पोलिस ठाण्यात अर्ज करत हा भूखंड हा त्याच्या वडिलांच्या नावावर असून, त्यांच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण करून बोर्ड व पत्रे लावले असल्याबाबत तक्रार केली होती. तसेच या जागेवर स्वतःच्या मालकीचा बोर्ड लावला. या भूखंडाच्या मालकी हक्कावरून महाराष्ट्र व केंद्र सरकार (मिठागर विभाग) यांच्यातील वाद हा न्यायप्रविष्ट आहे. याठिकाणी केंद्र सरकारकडून २८ मार्च ते १ एप्रिलदरम्यान मिठागर विभागाकडून नोटीस बोर्ड लावण्यात आले होते.
आरोपी हा नवी मुंबईचा रहिवासी आहे. याप्रकरणी दोन्ही तक्रार अर्जावरून केलेल्या चौकशीत बनावट कागदपत्रे सादर केल्याचे समोर आले. त्यानुसार, गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे. अद्याप कुणाला अटक करण्यात आलेली नाही.
-दीपक बागुल, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, टिळकनगर, पोलिस ठाणे
कागदपत्रांच्या छाननीनंतर...
- नोटीस बोर्डवर राजन श्याम गुल्हाने याने स्वतःचा बोर्ड लावला. मिठागर विभागाकडून याबाबत तक्रार अर्ज आल्याने टिळक नगर पोलिसांनी तपास सुरू केला.
- राजन याने दिलेली कागदपत्रे तलाठी कार्यालयात पडताळणीसाठी पाठवले. चौकशीत, ही जागा महाराष्ट्र सरकारच्या मालकीची असून, त्याबाबत तलाठी कार्यालय, मुलुंड येथील कार्यालयात ७/१२ उतारा व मालमत्ता पत्रकावर कायदेशीर नोंदी असल्याचे आढळून आले.
- राजन याने सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी सरकारी जागा बळकाविण्याचा प्रयत्न तसेच पोलिस ठाण्यात खोटी
माहिती दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.