तस्करीप्रकरणी अरिहंत ज्वेलर्सचा मालक अटकेत
By admin | Published: December 23, 2015 01:28 AM2015-12-23T01:28:03+5:302015-12-23T01:28:03+5:30
पॅरिसहून सात किलो सोन्याची तस्करी करण्याप्रकरणी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आलेल्या राज जाधव याने दिलेल्या माहितीच्या आधारे
मुंबई : पॅरिसहून सात किलो सोन्याची तस्करी करण्याप्रकरणी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आलेल्या राज जाधव याने दिलेल्या माहितीच्या आधारे सोन्याच्या तस्करीचे मोठे रॅकेट उजेडात आले असून, या प्रकरणी आता कस्टम विभागाने अरिहंत ज्वेलर्सचे
मालक गौरव जैन याला अटक केली आहे.
एअर इंटेलिजन्स युनिट व कस्टम विभागाचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद लांजेवार यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, ७ डिसेंबर रोजी पॅरिसहून मुंबईला आलेल्या राज जाधव या तरुणाकडे सोन्याचे प्रत्येकी एक किलोचे सात सोन्याचे बार आढळले होते. यासंदर्भात तो अटकेत आहे. चौकशीदरम्यान, त्याने तस्करी केलेले सोने मुंबईतल्या अरिहंत ज्वेलर्ससाठी आणल्याची माहिती दिल्यानंतर, या अनुषंगाने गौरव जैन व त्याची बहीण अपेक्षा जैन हिची चौकशी करण्यासाठी कस्टम्स विभागाने समन्स जारी केले होते. या दोघांची सखोल चौकशी केली. सखोल चौकशीअंती गौरव जैन यांना कस्टम्स अॅक्ट कलम १०४ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. कस्टम्स विभागाने आता अरिहंत ज्वेलर्सचे दुकान सील करण्यात आले असून, तेथून अनेक कागदपत्रे अधिक तपासासाठी ताब्यात घेण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)