मालकांनो सावधान..!

By Admin | Published: September 25, 2015 03:19 AM2015-09-25T03:19:39+5:302015-09-25T03:19:39+5:30

कमी मोबदल्यात लहान मुलांना राबविणाऱ्या मालकांनो सावधान...बालमजुरीविरुद्ध पोलिसांनी केलेल्या कारवाई गेल्या सहा महिन्यात १०० मालकांना कोठडीची हवा खावी लागली आहे.

Owners .. be careful! | मालकांनो सावधान..!

मालकांनो सावधान..!

googlenewsNext

मनीषा म्हात्रे, मुंबई
कमी मोबदल्यात लहान मुलांना राबविणाऱ्या मालकांनो सावधान...बालमजुरीविरुद्ध पोलिसांनी केलेल्या कारवाई गेल्या सहा महिन्यात १०० मालकांना कोठडीची हवा खावी लागली आहे. बालमजुरी प्रतिबंधक कायदा अधिक कठोर केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यामध्ये २० सप्टेंबरपर्यंत ७९८ बालकांची सुटका करण्यास अंमलबजावणी विभागाला यश आले.
बिहार, उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यासह नेपाळमधून येणाऱ्या बालमजुरांची संख्या अधिक असून अवघ्या एक ते तीन हजार रुपयांसाठी ते मुंबईत काम करतात. कमी वेतनामध्ये त्यांच्याकडून १२-१२ तास मजुरी करुन घेतली जाते. महाराष्ट्रासह परराज्यातून आलेले तब्बल ४ हजार बालमजुर मुंबईच्या विविध भागांमध्ये काम करत असल्याचे पोलिसांनी प्रथम संस्थेच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले होते. चेंबुर शिवाजी नगर, गोवंडी, धारावी, सायन, भांडुप सोनापुर, साकीनाका या परिसरांमध्ये चालणारे कपडा व्यवसाय, चर्मोद्योग, हॉटेल व्यवसायामध्ये बाल मजुरांची संख्या अधिक आहे. बालमजुरीला कायद्याने बंदी घातली तरी मालक मंडळी कमी मोबदल्यात त्यांना राबवून फायदा घेतात. त्यात बालमजुरीचा कायदाही जामीनपात्र असल्याने या मालकांचे फावत होते.
त्यात अंमलबजावणी विभागाचे उपायुक्त प्रवीण पाटील यांनी बालमजुरीचे गांभीर्य जाणून यामध्ये कठोर कारवाईसाठी प्रयत्न सुरु केले. मार्च २०१५ मध्ये या कायद्यात शासनाने सुधारणा करुन ३७० (१) कलमाचा समावेश केला. हे कलम अजामीनपात्र असून त्यात किमान सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. त्यात जामिनावर सुटण्यासाठी कितीही प्रयत्न केले, तरी मालकांना किमान दोन ते तीन महिने पोलीस कोठडीची हवा खावी लागते. हा कायदा लागू झाल्यापासून २० सप्टेंबरपर्यंत तब्बल १०० मालकांवर या कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. त्यात गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक कारवाई यंदा अंमलबजावणी पथकाकडून करण्यात आली आहे. त्यात ३४८ गुन्हे दाखल झाले असून ४९७ मालकांना अटक करुन ७९८ बालकामगार मुक्त करण्यात आले आहे.
कायद्यातील बदलामुळे चाप
कायद्यातील बदलामुळे बालमजुरी करुन घेणाऱ्या मालकांना नक्कीच चाप बसेल. बालमजुरीसारखे प्रकार रोखण्यासाठी जनजागृतीबरोबर विविध उपक्रम राबवित आहोत.
- प्रवीण पाटील, पोलीस उपायुक्त, अंमलबजावणी

संस्थांनी पुढाकार घ्यावा...
बालकामगार, बालगुन्हेगार तसेच बाल भिक्षेकरी मुलांची सुटका केल्यानंतर त्यांच्या पुढील भवितव्यासाठी अजूनही संस्था हवा तसा पुढाकार घेत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यासाठी संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: Owners .. be careful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.