Join us

केंद्र सरकारचे कायदे मालकधार्जिणे - हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2021 4:05 AM

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा ६८ वा वर्धापन दिनलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कामगार ही व्याख्याच केंद्र सरकारकडून नष्ट ...

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा ६८ वा वर्धापन दिन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कामगार ही व्याख्याच केंद्र सरकारकडून नष्ट करण्याचे काम सुरु आहे. केंद्राचे कायदे मालकधार्जिणे असून, कामगारांना वाऱ्यावर सोडण्याचे काम करण्यात येत आहे. मात्र, राज्य सरकारच्या अधिकारात कामगार हितासाठी जे काही करणे शक्य आहे ते केले जाईल. यासाठी राज्य शासनाकडून नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागविण्यात येतील आणि कामगारांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देणारे कायदे राज्य सरकारकडून केले जातील. असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार, १ जुलै रोजी प्रभादेवीच्या हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद-सिंगल, असंघटित कामगार मंडळाच्या विकास आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, ‘युनिसेफ’च्या मुख्य क्षेत्रीय अधिकारी राजेश्वरी चंद्रशेखर, कल्याण आयुक्त रविराज इळवे व मान्यवर उपस्थित होते.

मुश्रीफ म्हणाले की, कोरोनाच्या काळात डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कामगार, पोलीस, नगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद कर्मचारी, कारखाना कामगार यांच्यामुळे संकटाचा सामना करणे शक्य झाले. कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून कामगारांच्या गरजांकडे लक्ष दिले जाईल. त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करु, असेही ते म्हणाले.

‘युनिसेफ’च्या राजेश्वरी चंद्रशेखर म्हणाल्या की, महाराष्ट्रात ९० लाख कुशल कामगारांची आवश्यकता आहे. अशा कुशल कामगार आणि गरजू आस्थापना यांच्यात समन्वय साधण्याचे काम युनिसेफच्या युवाह उपक्रमांतर्गत करण्यात येत आहे. यात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे, चांगले उद्योजक घडविणे, शिक्षण अर्धवट सुटलेल्या तरुणांना २१व्या शतकातील कौशल्य शिकवणे आणि संशोधनातून युवा पिढी समाजात बदल कसे घडवेल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

कल्याण आयुक्त इळवे म्हणाले की, मंडळातर्फे क्रीडा प्रशिक्षण उपक्रम राबविले जातात. त्यांच्यात सूसुत्रता यावी, यासाठी महाकल्याण क्रीडा प्रबोधिनीची स्थापना केली आहे. या माध्यमातून खेळाडूंना एकाच छताखाली दर्जेदार सुविधा उपलब्ध करुन देण्याचा मंडळाचा मानस आहे.

यावेळी महाकल्याण क्रीडा प्रबोधिनीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पी. डी. हिंदुजा हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरात ३९ जणांनी रक्तदान केले. यावेळी मैदानात वृक्षारोपणदेखील करण्यात आले. यावेळी मंडळाच्या वाटचालीत मोलाचे योगदान दिल्याबद्दल शिवछत्रपती पुरस्कार विजेते पॉवरलिफ्टर सूर्यकांत गर्दे आणि टेबल टेनिस प्रशिक्षक गुरुप्रसाद पार्टे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी द फोनिक्स जिम्नॅस्टिक्स ॲकॅडमी यांच्या चमूने संगीताच्या तालावर जिम्नॅस्टिक्सचे प्रात्यक्षिक सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले तर मार्शल आर्ट्स असोसिएशन ऑफ मुंबई यांच्यामार्फत कीक बॉक्सिंगचे सादरीकरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना साठे यांनी केले तर सहाय्यक कल्याण आयुक्त माधवी सुर्वे यांनी आभार मानले.