Join us

पॉकेटमनीतून जे. जे. रुग्णालयाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर; पौडवाल कुटुंबातील लहान पिढीची सामाजिक बांधिलकी!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2021 4:27 AM

अनुराधा पौडवाल यांच्या कुटुंबात बरेच लहान सदस्य आहेत आणि याच छोट्या मुलांनी स्वतःच्या पॉकेटमनीचे पैसे एकत्र करून, त्यातून जे. जे. रुग्णालयाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिला आहे.

राज चिंचणकर - मुंबई : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात, या व्याधीने बाधित झालेल्यांना अनेक जण आपापल्या परीने मदत करण्यात खारीचा वाटा उचलत आहेत. मोठी माणसे यात आघाडीवर असतानाच, काही लहान मुलांनी त्यांना मिळणाऱ्या पॉकेटमनीचा उपयोग अशा कार्यासाठी केल्याचे उदाहरण आता समोर आले आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल व दिवंगत संगीतकार अरुण पौडवाल यांच्या परिवारातील सर्वात लहान पिढीच्या सदस्यांनी ही सामाजिक बांधिलकी जपली आहे. 

अनुराधा पौडवाल यांच्या कुटुंबात बरेच लहान सदस्य आहेत आणि याच छोट्या मुलांनी स्वतःच्या पॉकेटमनीचे पैसे एकत्र करून, त्यातून जे. जे. रुग्णालयाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिला आहे. आम्ही आमच्या पाकिटातून काही दान करू शकतो, मग तुम्ही का नाही, असा संदेशही या मुलांनी यासाठी खास तयार केलेल्या चित्रकोलाजातून दिला आहे.

अरुण पौडवाल यांच्या ९ मे रोजी असलेल्या जयंती दिनाचे औचित्य साधून पौडवाल कुटुंबीयांच्या सूर्योदय फाऊंडेशनतर्फे त्याचे वितरण केले जाणार आहे. अनुराधा पौडवाल यांच्या निवासस्थानी, जे.जे. रुग्णालयाचे पदाधिकारी त्याचा स्वीकार करणार आहेत. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीही कोरोना प्रादुर्भावाच्या काळात पौडवाल कुटुंबीयांनी जे.जे. रुग्णालयाकडे पीपीई किट आणि तत्सम सामग्री सुपूर्द केली होती.

अभिमानाची गोष्ट... आमच्या परिवारातील छोट्या मुलांनी आपणहून त्यांच्या पॉकेटमनीचा विनियोग समाजासाठी अशा पद्धतीने करावा, ही आम्हा संपूर्ण पौडवाल कुटुंबीयांसाठी खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. - अनुराधा पौडवाल, ज्येष्ठ पार्श्वगायिका 

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याऑक्सिजनहॉस्पिटलडॉक्टर