मुंबई : काेरोना रुग्णसंख्या वाढत असून, उपचारासाठी ऑक्सिजनची मागणीही वाढत आहे. त्यामुळेच मध्य रेल्वेप्रमाणेच पश्चिम रेल्वेनेही दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्रात लिक्विड ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार पश्चिम रेल्वेची ही एक्स्प्रेस ऑक्सिजनचा साठा घेऊन गुजरातहून निघाली असून, साेमवार, २६ एप्रिल राेजी कळंबोलीला पाेहाेचेल.
रविवारी सांयकाळी ६.०३ वाजता तीन ऑक्सिजन टँकर गुजरात येथील हापा येथून रवाना झाले आहेत. सोमवारी सकाळी ते कळंबोली येथे पोहोचतील. ऑक्सिजन एक्स्प्रेस ८६० कि.मी.चे अंतर पार करणार असून, या टँकरमध्ये ४४ टन ऑक्सिजन गॅस आहे. ऑक्सिजन एक्स्प्रेससाठी हापा येथील गुड्स शेडमध्ये कमी वेळेत तयारी करण्यात आली. ही एक्स्प्रेस वीरामगम, अहमदाबाद, वडोदरा, सुरत आणि वसईरोड असा प्रवास करील. दरम्यान, यापूर्वी कळंबोली ते विझाग आणि विझाग ते नाशिकपर्यंत पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस मध्य रेल्वेने यशस्वीरीत्या चालविली.