दोन टँकर नाशिक, तर दोन नगरला पाठविणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्रातील ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी १९ एप्रिलला कळंबोलाहून विशाखापट्टणम येथे पाठविलेली ऑक्सिजन एक्स्प्रेस उद्या, शनिवारी नाशिकला पोहोचणार आहे.
या गाडीत सात टँकर होते. त्यातील तीन नागपूरला उतरवून तेथून ग्रीन कॉरिडॉरने ठिकठिकाणी पाठवण्यात आले. त्याच पद्धतीने चार टँकरपैकी दोन नाशिकला, तर दोन नगरला पाठविले जाणार आहेत.
या टँकरमध्ये ऑक्सिजन भरल्यानंतर ही एक्स्प्रेस गुरुवारी रात्री १० च्या सुमारास विशाखापट्टणमहून महाराष्ट्रासाठी रवाना झाली. ही एक्स्प्रेस शनिवारी सकाळी नाशिक येथे पोहोचणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यातील तीन टँकर शुक्रवारी रात्री नागपूरला उतरविण्यात आले. उरलेल्या चार टँकरपैकी दोन नाशिकला तर दोन नगरला पाठविले जातील अशा माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.
गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात भासत आहे. त्यामुळे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडाही भासू लागला आहे. ही गरज भागविण्यासाठी महाराष्ट्राकडून अन्य राज्यांची मदत घेतली जात आहे. त्यासाठी रेल्वेच्या मदतीने सात टँकर रो रो सेवेमार्फत कळंबोलीतून विशाखापट्टणम येथे पाठविण्यात आले होते. महाराष्ट्रात या एक्स्प्रेसचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी ग्रीन कॉरिडोर केला जाणार आहे.