मनोहर कुंभेजकर
मुंबई : कोविड 19 मुळे नागरिकांच्या शरीरातील ऑक्सिजनच्या प्रमाणाला किती महत्व आहे याची प्रचिती देशातील नागरिकांना आली आहे. झाडे ही मानवाला ऑक्सिजन देतात. नागरिकांना ऑक्सिजन चांगल्या प्रमाणात मिळण्यासाठी जुहू बीच जवळील नॉव्हटेल हॉटेलच्या लगत असलेल्या मोकळ्या जागेत मुंबईतील पहिले ऑक्सिजन गार्डन साकारले जाणार आहे. पूर्वीचे सुनील दत्त उद्यान म्हणून याची ओळख होती.
पूर्वी या मोकळ्या जागेत अँटी सोशल एलिमेन्टचा आणि ड्रग माफियांचा वावर असे. अंधेरी पश्चिम येथील भाजपा आमदार अमित साटम यांनी या उद्यानाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी पुढाकार घेतल्यानेे सदर म्हाडाचा भूखंड नंतर पालिकेला हस्तांतरीत करण्यात आला. आता या जागी मुंबईतील पाहिले ऑक्सिजन गार्डन साकारणार असून येथे नागरिकांना मुबलक प्रमाणात ऑक्सिजन मिळणार असून येथे मॉर्निंग वॉकची सुविधा व योगा केंद्र नागरिकांना उपयुक्त ठरणार असल्याची माहिती त्यांनी लोकमतला दिली.
पालिकेच्या प्रभाग क्रमांक 71 चे भाजपा नगरसेवक अनिष मकवानी यांच्या संकल्पनेतील ऑक्सिजन गार्डन येथे साकारणार आहे.आपण याजागी ऑक्सिजन उद्यान उभे करा असा प्रस्ताव पालिकेला दिला होता.तो मंजूर झाला असून या उद्यानासाठी पालिकेला सुमारे 42 लाख रुपये खर्च येणार आहे. पुढील वर्षी जून 2022 मध्ये सदर उद्यान तयार होणार आहे. सुमारे 4000 चौरस फूट जागेत सदर उद्यान साकारणार असून जास्त ऑक्सिजन देणारी तुळस आणि अन्य झाडांची आणि झुडपांची येथे लागवड करण्यात येणार असल्याचे मकवानी यांनी सांगितले.