प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प : राजेश टोपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:06 AM2021-04-12T04:06:59+5:302021-04-12T04:06:59+5:30
मुंबई : राज्यात ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभारण्याबाबत चाचपणी झाली. प्रत्येक जिल्ह्यात लिक्विड ऑक्सिजन प्लान्ट उभारण्याबाबत सोमवारी उपमुख्यमंत्री अजित ...
मुंबई : राज्यात ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभारण्याबाबत चाचपणी झाली. प्रत्येक जिल्ह्यात लिक्विड ऑक्सिजन प्लान्ट उभारण्याबाबत सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी टास्क फोर्ससोबतच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.
ऑक्सिजन निर्मितीसोबतच विविध विषयांवर चर्चा झाली. सध्या अनेक ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी गर्दी होते, विलंब लागतो. हे दुर्दैवी असून या घटना टाळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात किंवा ‘अ’ वर्ग महापालिकेत विद्युत किंवा गॅसवरील शवदाहिनी उभारण्याबाबत चर्चा झाली. राज्यात लाॅकडाऊनची परिस्थिती निर्माण झाल्याचे मत टास्क फोर्सच्या सदस्यांचे झाले आहे. यासंदर्भात आणखी चर्चा करून विविध विभागांशी बोलून, मंत्रिमंडळाशी चर्चा करून मुख्यमंत्री याबाबतचा निर्णय जाहीर करतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
रेमडेसिविर इंजेक्शन तुटवड्यामुळे केंद्र सरकारने त्याची निर्यात थांबविण्याचा जो निर्णय घेतला आहे तो स्वागतार्ह असून त्यामुळे गरजू रुग्णांना वेळेवर रेमडेसिविर उपलब्ध होण्यास मदत होईल, असे टोपे म्हणाले. काही दिवसांपूर्वी मंत्री टोपे यांनी रेमडेसिविर उत्पादकांची बैठकही घेतली होती. आज केंद्र सरकारने निर्यात थांबविण्याचा निर्णय जाहीर केल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना दिलासा मिळाला आहे, असेही राजेश टोपे म्हणाले.