Join us

मुंबई महापालिकेत ३२० कोटींचा ऑक्सिजन प्लांट घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 4:06 AM

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचा आरोपलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांत उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्लांटमध्ये ३२० ...

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांत उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्लांटमध्ये ३२० कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. हे कंत्राट तीन पट जादा दराने देताना कंत्राटदार आणि पालिकेच्या अभियंत्यांमध्ये साटेलोटे झाल्याचा आरोप मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केला आहे. याची दक्षता विभागातर्फे चौकशी करण्याची मागणी त्यांनी मुंबईचे पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे यापूर्वी ८४ कोटींचे काम दिले होते. मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये या कंत्राटदारची पहिली १६ ऑक्सिजन प्लांट उभारण्याची कामे पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे ती पूर्ण होईपर्यंत त्याला नवे कंत्राट देऊ नये. तसेच त्याच्या कागदपत्रांची तपासणी करावी, अशी मागणी अस्लम शेख यांनी केली आहे.

या कंपनीला राणीच्या बागेतील पेंग्विन प्रकल्पातील निकृष्ट कामामुळे दंड करण्यात आला होता. याच कंत्राटदाराला जयपूर येथील सवाई मानसिंग वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे कंत्राट दिले होते. मात्र, तो प्रकल्प पूर्ण करू न शकल्याने त्याला काळ्या यादीत टाकण्यात आले होते. अशी पार्श्वभूमी असतानाही या कंत्राटदाराला मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांतील ऑक्सिजन प्लांटचे कंत्राट कसे दिले गेले, असा सवाल अस्लम शेख यांनी केला आहे.