मुंबई : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिल्याने राज्यातील लहान मुलांच्या सुरक्षेसाठी, उपचारांसाठी सक्षम स्वतंत्र व्यवस्था उभारण्यात यावी. रेमडेसिविरच्या पुरेशा पुरवठ्यासह ऑक्सिजनच्या अखंडित उपलब्धतेसाठी सूक्ष्म नियोजन करावे. राज्यात उभारण्यात येणाऱ्या नवीन ऑक्सिजन प्रकल्पांचे काम वेगाने पूर्ण करण्याबरोबरच ऑक्सिजन वापराचे ऑडिट करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दिल्या.
मंत्रालयात राज्यातील कोरोना परिस्थितीसह प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री पवार यांनी घेतला. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख व अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे (दोघेही व्हीसीद्वारे), मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. लहान मुलांना कोरोनाचा अधिक धोका असल्याने त्यांची सुरक्षा, उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारावी. लहान मुलांचे व्हेंटिलेटर तसेच त्यांच्यासाठी लागणारी औषधे, इतर उपचारांसाठीची सामुग्री उपलब्ध करावी. तिसरी लाट येण्यापूर्वी ही व्यवस्था यथाशीघ्र उभारण्याचे निर्देश पवार यांनी यावेळी दिले.
राज्यासाठी २५ हजार मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा वाढविण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा काढण्यात येत आहेत. हवेतून ऑक्सिजननिर्मिती करणाऱ्या ‘पीएसए’ प्लांटची निर्मिती प्रत्येक जिल्ह्यात करण्यात येत आहे. राज्यात ३६ जिल्ह्यांमध्ये ३०१ प्लांट उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यापैकी ३८ प्लांट कार्यरत आहेत. या ३८ प्लांटमधून ५१ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयांत व जिल्हा सामान्य रुग्णालयांत ‘पीएसए’ प्लांट उभारण्यात येत आहेत. २४० प्लांट उभारण्यासाठीची वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही काळात राज्यातच सुमारे ४०० मेट्रिक टन प्रतिदिन ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. या ऑक्सिजनद्वारे १९ हजारांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेडची गरज पूर्ण होईल, असेही पवार यांनी सांगितले.
रुग्णसंख्येच्या प्रमाणात ऑक्सिजनचे वितरण कराउपलब्ध मेडिकल ऑक्सिजनचे वितरण कोविड रुग्णांची जिल्हानिहाय संख्या लक्षात घेऊन करण्यात यावे, असे सांगत पवार यांनी त्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक दोन विभागांसाठी सचिव दर्जाचे अधिकारी त्यावर लक्ष ठेवून त्याचे नियंत्रण करत आहेत. त्यांनी नवीन प्लांटच्या उभारणीच्या कामात समन्वय ठेवत काम वेगाने करून घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.