Oxygens: वडिलांना ऑक्सिजन बेड न मिळाल्यानं सलग २६ तास प्रवास करून मुलाने यूपीवरून मुंबई गाठली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 06:12 AM2021-05-17T06:12:34+5:302021-05-17T06:14:36+5:30
सलग २६ तास अयोध्या ते मुंबई हा दीड हजार किलोमीटरचा प्रवास करून मुलाने आपल्या वडिलांना उपचारासाठी मुंबईत आणले.
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. आयसीयू बेड, इंजेक्शन व ऑक्सिजन यांच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे व रुग्णांच्या नातेवाइकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. अशीच काहीशी घटना उत्तरप्रदेश येथील एका कुटुंबासोबत घडली आहे. आपल्या कोरोनाबाधित वडिलांना उत्तरप्रदेशमध्ये कुठेही ऑक्सिजन बेड उपलब्ध न झाल्यामुळे त्या मुलाने वडिलांना उपचारांसाठी रुग्णवाहिकेने थेट मुंबईत आणले.
सलग २६ तास अयोध्या ते मुंबई हा दीड हजार किलोमीटरचा प्रवास करून मुलाने आपल्या वडिलांना उपचारासाठी मुंबईत आणले. यामुळे उत्तरप्रदेशमधील आरोग्य यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. उत्तरप्रदेशमधील अयोध्या येथे राहणारे शमशाद खान हे व्यावसायिक बैठकीनिमित्त आसाम येथे गेले असताना त्यांना त्या ठिकाणी कोरोनाची बाधा झाली. दिवसेंदिवस तब्येत बिघडू लागल्याने त्यांना त्यांचा मुलगा सरफराज खान याने उपचारांसाठी अयोध्येत आणले. यावेळी अयोध्येतील फैजाबाद येथील कोणत्याही रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने त्यांना दाखल करून घेतले नाही.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर मुलाने ऑक्सिजनसाठी शोधाशोध केली. मात्र कुठेही ऑक्सिजन उपलब्ध झाला नाही. यानंतर तब्येत अधिक खालावल्याने डॉक्टरांनी व्हेंटिलेटरची गरज असल्याचे सांगितले. परंतु व्हेंटिलेटरही कुठेच उपलब्ध झाला नाही. सगळ्या रुग्णालयांमध्ये सारखीच अवस्था असल्याने अखेर शमशाद यांचा मुलगा सरफराज व भाऊ रिजवान खान यांनी त्यांना रुग्णवाहिकेने २३ एप्रिल रोजी मुंबईत उपचारांसाठी आणण्याचा निर्णय घेतला. रुग्णवाहिकेने रुग्ण फैजाबाद येथून मुंबईला नेण्याचे चार लाख रुपये सांगितले. परंतु हेच दर मुंबईतील रुग्णवाहिकेला विचारले असता त्यांनी ७५ हजार रुपयांत रुग्ण मुंबईला आणण्याचे कबूल केले. मुंबईतून तीन ऑक्सिजन सिलिंडर घेऊन दोन वॉर्डबॉय व एक डॉक्टर यांच्यासहीत रुग्णवाहिका फैजाबाद येथे दाखल झाली व सलग २६ तास प्रवास करीत शमशाद यांना उपचारासाठी मुंबईत आणले.