Join us

पी. जी. गरोडिया संघाचा दबदबा

By admin | Published: November 10, 2015 2:00 AM

दुसऱ्या डॉन बॉस्को आतंरशालेय बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत १६ वर्षांखालील मुलांच्या गटात पी.जी. गारोडिया शाळेने दमदार खेळाच्या जोरावर विजेतेपदावर कब्जा केला.

मुंबई : दुसऱ्या डॉन बॉस्को आतंरशालेय बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत १६ वर्षांखालील मुलांच्या गटात पी.जी. गारोडिया शाळेने दमदार खेळाच्या जोरावर विजेतेपदावर कब्जा केला. त्याच वेळी मुलींच्या गटात बॉम्बे स्कॉटीश संघाने एकहाती वर्चस्व राखत बाजी मारली. मध्य रेल्वेचा स्टार खेळाडू फरदीन खान, आतंरराष्ट्रीय खेळाडू श्रेया सालियन यांच्या उपस्थितीत विजेत्या खेळाडूंना गौरविण्यात आले. माटुंगा येथील डॉन बॉस्को स्कूलच्या वतीने झालेल्या या स्पर्धेत मुलांच्या अंतिम सामन्यात गरोडिया संघाने स्पर्धेत चमकदार आगेकूच करणाऱ्या शिशुवनचा धुव्वा उडवला. गरोडियाच्या अभिषेकने तब्बल १८ बास्केट केले. त्याच्या आक्रमक खेळाच्या जोरावर मध्यंतराला गरोडियाने २१-१४ अशी भक्कम आघाडी घेतली. यानंतर गरोडियाने आणखी आक्रमक पवित्रा घेताना, शिशुवनच्या आव्हानातली हवा काढली. शिशुवनच्या कमजोर बचावाचा फायदा घेत, गारोडियाने बास्केटचे अर्धशतक पूर्ण केले. तनिषनेदेखील ११ बास्केट करताना अभिषेकला उपयुक्त साथ देत, संघाच्या विजेतेपदावर ५४-३५ असा शिक्का मारला. शिशुवनच्या आर्यन शाह (८) वगळता अन्य खेळाडूला चमकदार कामगिरी करता आली नाही. मुलींच्या गटात बॉम्बे स्कॉटीश संघाला मेरी इमॅक्युलेट जोरदार टक्कर दिली. स्कॉटीशच्या तुफान फॉर्मात असलेल्या अंजली नारियन व सान्या रुनवाल जोडीने पुन्हा आपली जादू दाखवली. या जोडीने मेरी संघाची बचावफळी भेदत अनुक्रमे १० आणि ९ बास्केट केले. इमॅक्युलेट संघाने मध्यंतराला १२-१० अशी आघाडी घेत नियंत्रण राखले होते. मात्र, स्कॉटीशने झुंजार पुनरागमन करताना सामन्याचे चित्र पालटले. सातत्याने आक्रमक चाली रचून स्कॉटीशने इमॅक्युलेटच्या खेळाडूंना दबावाखाली आणले. या जोरावर त्यांनी आघाडी घेत, अखेर २६-१६ असा विजय मिळवला.