Join us

पु. ल. देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त सात दिवसीय 'पु. ल. कला महोत्सव'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2023 8:40 PM

८ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत रसिकांना सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

मुंबई - महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबईच्या वतीने ८ ते १४ नोव्हेंबर दरम्यान 'पु. ल. कला महोत्सव २०२३'चे आयोजन करण्यात आले आहे. ८ नोव्हेंबरला सायंकाळी ७ वाजता अकादमीच्या कलांगाणात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.  हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य आहे.

साहित्य, गायन, वादन, नृत्य, नाट्य अशा विविध कला प्रकारांवर आधारलेला पु. ल. कला महोत्सव कार्यक्रमांची पर्वणी ठरेल. उद्घाटनानंतर कलांगणात कोल्हापूरातील काफिला संस्थेचा 'जियारत' हा कार्यक्रम होईल. ९ नोव्हेंबरला सकाळी ७ वाजता नवीन लघुनाट्यगृहात पं. डॉ. राम देशपांडे यांचा 'शतदीप उजळले' हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम होईल. संध्याकाळी ६:३० वाजता ओमकार अंध-अपंग सामाजिक संस्थेचे दिव्यदृष्टी असलेले कलाकार मल्लखांब सादर करतील. ७:३० वाजता वाशीतील अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची 'संगीत संध्या' होईल.

१० नोव्हेंबरला सायंकाळी ५:३० वाजता अकादमीच्यावतीने 'शोंगित शिल्पी पी. एल. बाबू' हा कार्यक्रम होईल. यात रविंद्र संगीतासाठी अरुंधती देशमुख, बाऊल संगीतासाठी डॉ. उत्तरा चौसाळकर सहभागी होतील. सायंकाळी ७:३० वाजता विदुषी आशा खाडीलकर आणि सहकारी 'पु. ल. एक आनंदस्वर' सादर करतील. ११ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजाता पं. मिलिंद रायकर आणि सहकारी 'व्हायोलिनचे रंग-तरंग' कार्यक्रम होईल. ७ वाजता संस्कार भारती, कोकण प्रांताचा 'लोकरंग दिवाळी संध्या' हा कार्यक्रम होईल. १३ नोव्हेंबरला सायंकाळी ६ वा. अभिजात रंगयात्रा संस्थेचा संग्रहापलिकडचे पु.ल. आणि नंतर 'स्त्री व्यक्तिरेखा.... पु. ल. यांच्या लेखनातल्या' हा कार्यक्रम सादर केला जाईल.

१४ नोव्हेंबरला सकाळी ७ वाजता पं. शैलेष भागवत आणि विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर 'अभ्यंग संगीत साधना महोत्सव - दीपावली पहाट' सादर करतील. बालदिनाचे औचित्य साधून विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सकाळी १० वाजता नवीन लघुनाट्यगृहात, 'फुलवा मधुर बहार' हे संगीत बालनाट्य कलांगण, मुंबई ही संस्था सादर करेल. सायंकाळी ५ वाजता भारतीय मूर्तीकलेवर आधारित 'भगवती' हा स्त्री-शक्तीचा जागर करणारा कार्यक्रम ज्येष्ठ नृत्यांगना सोनिया परचुरे आणि सहकारी सादर करतील. रात्रौ ८ वाजता पं. कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'अभ्यंग संगीत साधना महोत्सव'अंतर्गत विदुषी कलापिनी कोमकली यांच्या गायनाने पुलं कला महोत्सवाची सांगता होणार आहे.

टॅग्स :पु. ल. देशपांडे