पी (उत्तर)मध्ये भाजपाचे संख्याबळ वाढले

By admin | Published: February 26, 2017 03:11 AM2017-02-26T03:11:08+5:302017-02-26T03:11:08+5:30

पी(उत्तर) विभागात मालाड (प.) आणि दिंडोशी विधानसभा मतदारसंघात काँंग्रेस-शिवसेनेला संमिश्र यश मिळाले असून भाजपाचे संख्याबळ वाढले आहे.

In P (North), BJP's strength increased | पी (उत्तर)मध्ये भाजपाचे संख्याबळ वाढले

पी (उत्तर)मध्ये भाजपाचे संख्याबळ वाढले

Next

- मनोहर कुंभेजकर,  मुंबई

पी(उत्तर) विभागात मालाड (प.) आणि दिंडोशी विधानसभा मतदारसंघात काँंग्रेस-शिवसेनेला संमिश्र यश मिळाले असून भाजपाचे संख्याबळ वाढले आहे. येथे एकूण १६ नगरसेवकांपैकी भाजपा ६, काँंग्रेस ४ आणि आता तुळशिराम शिंदे या विजयी अपक्ष उमेदवाराने शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्यामुळे येथील शिवसेना नगरसेवकांची संख्या ५ झाली आहे. राष्ट्रवादी काँंग्रेसची एकमेव नगरसेविका धनश्री भरडकर विजयी झाली आहे. पी(उत्तर)मध्ये भाजपा ६, शिवसेना ५, काँग्रेस ४, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी १, अपक्ष १ असे एकूण १६ नगरसेवक संख्याबळ झाले आहे़ येथे भाजपा हा सर्वात जास्त नगरसेवक असलेला पक्ष ठरला आहे़ त्यांचा प्रभाग समिती अध्यक्ष पी(उत्तर) मध्ये होणार आहे.
मालाड (प.) विधानसभा मतदारसंघात ३२, ३३, ३४, ३५, ४६, ४७, ४८ आणि ४९ असे एकूण ८ प्रभाग येतात. या विभागात ७ नगरसेवक होते. यंदा एका नगरसेवकाची भर पडली आहे. २०१२ ते २०१७ च्या पालिका निवडणुकीत काँंग्रेस ३, शिवसेना ३ आणि सिरील डिसोझा हा अपक्ष असे ७ नगरसेवक होते. विश्वास घाडीगावकर यांना न्यायालयाच्या निर्णयानंतर दिलासा मिळून त्यांना शिवसेनेचे नगरसेवकपद मिळाले. पूर्वी या विभागात शिवसेनेचे अजित भंडारी, अनघा म्हात्रे आणि विश्वास घाडीगावकर हे ३ नगरसेवक होते. निवडणुकीपूर्वी विश्वास घाडीगावकर यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत मनसेत प्रवेश केला. त्यांची पत्नी ३४ मध्ये वैशाली घाडीगावकर यांना पराभव पत्करावा लागला. यंदा शिवसेनेच्या प्रभाग ४९ मधून फक्त संगीता संजय सुतार या एकमेव नगरसेविका विजयी झाल्या. २०१२ ते २०१७ या कार्यकाळात मालाड (प)मध्ये भाजपाचा एकही नगरसेवक नव्हता. यंदा येथे भाजपाचे कमळ फुलून आले़ त्यांचे तीन नगरसेवक निवडून आले.

दिंडोशीत सेना-भाजपा समसमान
दिंडोशी विधानसभा मतदारसंघात ३७, ३८, ३९, ४०, ४१, ४२, ४३, ४४ असे आठ प्रभाग आहेत़ यामध्ये ३८, ३९, ४० मध्ये शिवसेनेचे ३, भाजपाचे ३, राष्ट्रवादी १ आणि अपक्ष १ असे एकूण ८ नगरसेवक विजयी झाले. प्रभाग ४१ मधून शिवसेनेचे माजी नगरसेवक सदाशिव पाटील यांचा शिवसेना बंडखोर उमेदवार तुळशीराम शिंदे यांनी पराभव केला. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री (उपक्रम) एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असलेल्या तुळशीराम शिंदे यांनी निकालाच्या दिवशी रात्री उशिरा मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेला समर्थन दिले़ त्यांचा शिवसेनेत रीतसर प्रवेश होणार आहे.
दिंडोशीत शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या आता ३ वरून ४ वर होणार आहे. २०१२ ते २०१७ या मागील कार्यकाळात भाजपाचे विनोद शेलार आणि ज्ञानमूर्ती शर्मा हे २ नगरसेवक होते. भाजपाची संख्या पूर्वीपेक्षा एकने वाढली असून आता त्यांचे येथे तीन नगरसेवक निवडून आले आहेत. राष्ट्रवादीच्या नगरसेविका रूपाली रावराणे आणि माजी नगरसेवक अजित रावराणे यांना पराभव पत्करावा लागला.
प्रभाग ४२मधून धनश्री भरडकर यांनी शिवसेनेच्या रीना सुर्वे यांचा पराभव केल्यामुळे राष्ट्रवादी काँंग्रेसने आपली पूर्वी असलेली एक जागा राखली आहे. मागील टर्ममध्ये काँग्रेसचे नगरसेवक असलेले भौमसिंग राठोड यांनी निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना प्रभाग ४३ मधून शिवसेनेने तिकीटदेखील दिले. त्यांचा येथे पराभव झाला. दिंडोशीत काँग्रेसचा एकही नगरसेवक यंदा निवडून आला नाही.

Web Title: In P (North), BJP's strength increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.