Join us

पी उत्तर वॉर्ड सहायक आयुक्तच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एकीकडे दुसऱ्या लाटेत कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असताना पालिकेच्या पी उत्तर वॉर्डमध्ये गेले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : एकीकडे दुसऱ्या लाटेत कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असताना पालिकेच्या पी उत्तर वॉर्डमध्ये गेले तीन महिने सहायक आयुक्तच नाही. मढ जेट्टीपासून ते थेट दिंडोशी आणि कांदिवली पूर्व विधानसभा मतदार संघाचा सुमारे १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेला आणि १८ नगरसेवक असलेला हा पश्चिम उपनगरातील हा मोठा वॉर्ड आहे.

येथील तत्कालीन सहायक आयुक्त संजोग कबरे यांना उपायुक्त विशेष प्रकल्पपदी बढती मिळाल्यानंतर सदर वॉर्डमध्ये वॉर्ड ऑफिसरच नाही. सध्या पी दक्षिण वॉर्डचे सहायक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांच्यावर या वॉर्डचा अतिरिक्त भार आहे.

जर येत्या सात दिवसांत पी उत्तर वॉर्डमध्ये सहायक आयुक्त नेमला नाही तर भाजप न्यायालयात दाद मागेल, असा इशारा उत्तर मुंबईचे भाजप जिल्हाध्यक्ष गणेश खणकर यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना एका पत्राद्वारे दिला आहे.

मढ-मालवणी भागात सुरू असलेली अनधिकृत बांधकामे, मोकळ्या जागेत होत असलेला भराव व सुविधांवर पडत असलेला ताण लक्षात घेता येथे पूर्णवेळ सहायक आयुक्तांची गरज असल्याचे खणकर यांनी पत्रात म्हटले आहे.

वारंवार मागणी करूनही गेले तीन महिने पी उत्तर वॉर्डला सध्या कोरोनासारख्या भीषण महामारीत वॉर्ड ऑफिसरच येथे नसणे हे पालिकेला भूषणावह नाही, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. याबाबत ‘लोकमत’ने यापूर्वी वृत्त दिले होते.

केवळ राजकीय दबावापोटी या वॉर्डची अशीच अवस्था राहावी असा तर छुपा हेतू नाही ना, अशी शंकादेखील त्या पत्रात गणेश खणकर यांनी व्यक्त केली आहे.

--- ---- -------------