मुंबई : टेकूच्या आधारावर उभी असलेल्या इमारतीतील एका घराच्या छतासह पंखा खाली कोसळून अपघात झाला. या अपघातात वडिलांसह त्यांच्या कुशीत झोपलेला पाच वर्षाचा मुलगा जखमी झाला. दोघांवर सायन रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. विनोद मोरे (४०), आर्यन मोरे (५) अशी जखमींची नावे असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.विक्रोळीच्या कन्नमवार नगर २ मधील इमारत क्रमांक ७१च्या स्वरांजलीमधील तिसऱ्या माजल्यावर रविवारी सकाळी ९ वाजता ही घटना घडली. मोरे कुटुंब भाड्याने गेल्या वर्षभरापासून येथे राहतात. रुग्णालयात काम करत असलेले मोरे पत्नी, मुलगा आर्यन आणि ८ महिन्यांच्या मुलीसोबत राहतात. रविवारची सुट्टी असल्याने ते आपला मुलगा आणि मुलीसोबत झोपले होते. सकाळी पाणी आल्याने पत्नी स्वयंपाक घरात काम करत होती. तिच्यापाठोपाठ मुलगी आईसोबत स्वयंपाक घरात गेली. अशात सकाळी नऊच्या सुमारास पंखा छतासह खाली कोसळला. यात विनोद आणि आर्यन खाली अडकले. विनोद यांच्या छातीवरच पंखा कोसळल्याने ते यात गंभीर जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने तब्बल तासाभराने त्यांना बाहेर काढण्यात यश आले. त्यांना तत्काल महात्मा फुले रुग्णालयातून सायन रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यामध्ये त्यांची मुलगी आणि पत्नी थोडक्यात बचावली. चार मजली असलेल्या या इमारतीत ३२ कुटुंबे राहतात. गेली ५० ते ५५ वर्षे जुनी असलेली ही इमारत सध्या टेकूच्या आधारावर उभी आहे. गेल्या ११ वर्षांपासून या इमारतीचा पुनर्विकास रखडला आहे. आतापर्यंत ३ विकासक येथे येऊन गेले. आठवड्याभरापूर्वी याच इमारतीच्या चौथ्या माजल्यावर राहत असलेल्या सोनावणे यांच्या घराचा स्लॅब कोसळला. यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली होती. याला जबाबदार कोण असा सवाल राहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)
छतासह पंखा कोसळून बाप-लेक जखमी
By admin | Published: April 17, 2017 3:22 AM