मुंबईत कारवाईचा वेग वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:07 AM2021-04-22T04:07:10+5:302021-04-22T04:07:10+5:30
गेल्या पाच दिवसांत १ हजार गुन्हे नोंद, हजारों जणांची धरपकड़ मुंबईत कारवाईचा वेग वाढला गेल्या पाच दिवसांत १ हजार ...
गेल्या पाच दिवसांत १ हजार गुन्हे नोंद, हजारों जणांची धरपकड़
मुंबईत कारवाईचा वेग वाढला
गेल्या पाच दिवसांत १ हजार गुन्हे नोंद, हजारो जणांची धरपकड
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत संचारबंदीचा आदेश लागू करण्यात आला असतानाही, नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे पाहून आता आणखी कठोर निर्बंध लागू करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी करताच मुंबई पोलिसांकडून कारवाईचा वेग वाढविण्यात आला आहे. गेल्या पाच दिवसांत १ हजार ४२ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. यात, विनामास्क फिरणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.
‘ब्रेक द चेन’अंतर्गत जारी करण्यात आलेल्या निर्बंध आणि संचारबंदीच्या काळात फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांना रस्त्यावरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे, तसेच अत्यावश्यक कामासाठीच नागरिकांना प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. असे असतानाही नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. १६ एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणखी कठोर निर्बंध लागू करण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या. त्यानुसार याबाबत स्थानिक पोलीस ठाण्यांंना मार्गदर्शन करत कारवाईचा वेग वाढविण्यास सांगितले.
त्यानुसार मुंबईत कारवाईचा वेग वाढला आहे. अशात, शुक्रवारपासून मंगळवारपर्यंत मुंबईत एकूण १ हजार ४३ गुन्हे नोंद केले आहेत. शहराची प्रवेशद्वारे आणि महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करून वाहने आणि संशयित नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे, तसेच गस्तीवरही भर देण्यात आला आहे. अशात, वाहन तपासणीदरम्यान होणारी गर्दी रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकड़ून रविवारपासून खासगी वाहनांसाठी कलर कोडिंग सिस्टीम लागू करण्यात आली आहे. यात, कलर कोड सिस्टमनुसार वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठी लाल रंगाचे, भाजीपाल्याच्या वाहनांसाठी हिरव्या रंगाचे, तर इतर अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी पिवळ्या रंगाचे स्टीकर बंधनकारक करण्यात आले आहे. अशात अत्यावश्यक सेवेत नसतनाही स्टीकर लावून फिरणाऱ्या ४८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बुधवारीही सकाळपासून पोलिसांकड़ून वाहनांची झाडाझडती सुरू होती. सार्वजनिक सुटी असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी वाहनांची गर्दी आणखीन कमी दिसून आल्यामुळे पोलिसांवरचा ताण काही प्रमाणात कमी दिसून आला, तर दुसरीकडे शिवाजी पार्क परिसरात सायंकाळच्या सुमारास काही मंडळी फिरताना दिसून आली. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नका, असे आवाहन पोलिसांकड़ून करण्यात येत आहे.
......................................