मुंबई : गेल्या सात वर्षांत मुंबई शहरांत ६ लाख २६ हजार नव्या घरांचे बांधकाम सुरू झाले. मात्र, त्यापैकी १ लाख ७३ हजार म्हणजेच जेमतेम २८ टक्के घरांची कामे पूर्ण झाली आहेत. छोट्या प्रकल्पांच्या पुर्णत्वाचा कालावधी सुमारे साडे पाच वर्षे असून तर मोठ्या गृहप्रकल्प पूर्ण होण्यासाठी साधारण साडे सहा वर्षे लागतात. मुंबईपेक्षा चेन्नई, बंगळूरू, हैद्राबाद या शहरांतील बांधकामांचा वेग जास्त आहे.
देशातील सात प्रमुख शहरांमध्ये २०१३ ते २०२० या कालावधीत एकूण २३ लाख घरांचे बांधकाम सुरू झाले आहे. त्यापैकी ३४ टक्के घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे १९ टक्के घरांचे काम फक्त एक वर्षात पूर्ण करण्याची किमया बांधकाम व्यवसायिकांनी करून दाखवली आहे. गृहनिर्माण प्रकल्प झटपट पूर्ण करण्यात दक्षिण भारतातील शहरे आघाडीवर आहेत. गेल्या सात वर्षांत चेन्नई शहरात १ लाख ३२ हजार घरांचे काम सुरू झाले. त्यापैकी तब्बल ६१ टक्के घरे आज वास्तव्यासाठी सज्ज आहेत. बंगळूरू येथे घरांचे बांधकाम पूर्ण होण्याचे प्रमाण ४८ टक्के असून हैद्राबाद येथे ते ४४ टक्के आहे. दिल्लीची धाव मात्र मुंबईपेक्षा कमी आहे. तिथल्या ५ लाख ५४ हजार घरांपैकी २६ टक्के घरांचे बांधकाम पूर्ण करण्याच व्यावसायिकांना यश आले आहे. अँनराँक प्राँपर्टी या प्रख्यात संस्थेने केलेल्या रिसर्चमध्ये ही माहिती समोर आली आहे. दक्षिण भारतातील विस्तारणा-या आयटी सेक्टरमुळे या भागांतील घरांची मागणी वाढली आहे. त्यामुळे तिथल्या प्रकल्प पुर्णत्वाचा वेग जास्त असल्याचे अँनराँकच्या अनूज पुरी यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे कोरोनाकाळात सर्वच प्रमुख शहरांतील नव्या बांधकामांचे प्रमाण कमी होत असताना दक्षिणेतील प्रमुख शहरांमध्ये मात्र त्यांची संख्या वाढत असल्याचे नाईट फ्रँकने दोन दिवसांपूर्वी प्रसिध्द केलेल्या अहवालात निष्पन्न झाले होते.
प्रकल्प पूर्ण होण्याचा सरासरी कालावधी (वर्षांमध्ये)
शहर | १०० ते ५०० घरे | ५०० पेक्षा जास्त घरे |
बंगळूरू | ४.३ | ५.६ |
चेन्नई | ४.१ | ५.५ |
हैद्राबाद | ४.२ | ५.९ |
कोलकत्ता | ४.८ | ६.४ |
मुंबई महानगर | ५.४ | ६.५ |
एनसीआर | ६ | ७.२ |
पुणे | ५ | ६.३ |