‘पॅड बँकेच्या माध्यमातून महिलांना मोफत पॅड देणार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 02:25 AM2018-02-22T02:25:10+5:302018-02-22T02:25:15+5:30
‘ती फाउंडेशन’च्या माध्यमातून आणि लोकसहभागातून देशात पहिली डिजिटल सॅनेटरी पॅड बँक सुरू करणा-या आणि महिलांचे ते ५ दिवस सुसह्य करणा-या भारती लव्हेकर यांना‘फर्स्ट लेडी’ राष्ट्रपती पुरस्काराने गौरवण्यात आले
मुंबई : ‘ती फाउंडेशन’च्या माध्यमातून आणि लोकसहभागातून देशात पहिली डिजिटल सॅनेटरी पॅड बँक सुरू करणाºया आणि महिलांचे ते ५ दिवस सुसह्य करणाºया भारती लव्हेकर यांना‘फर्स्ट लेडी’ राष्ट्रपती पुरस्काराने गौरवण्यात आले. डिजिटल सॅनिटरी पॅड बँकेला देशासह बाहेरदेशांतही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. देशातील पंजाब, हरियाणा, चंदीगड, आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, तामिळनाडू या विविध भागांसह पाकिस्तान, श्रीलंका, आफ्रिकेमधून सॅनेटरी पॅडसाठी या बँंकेकडे मागणी होत आहे. वर्सोवा विधानसभेच्या भाजपा आमदार भारती लव्हेकर यांनी या डिजिटल बँकेचा प्रचार व प्रसार करून देशातील सर्व गरजू महिलांना मोफत सॅनेटरी पॅड उपलब्ध करून देण्याचा निर्धार ‘लोकमत व्यासपीठ’ या मुलाखत सदरांतर्गत केला.
पॅड बँकची संकल्पना कशी सुचली?
- बीडसारख्या दुर्गम भागात आणि राज्यात अनेक ठिकाणी ग्रामीण भागात फिरत असताना आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या या महिला मासिक पाळीमध्ये दुपट्टा, कापडाचा वापर करतात. मासिक पाळीविषयी उघडपणे बोलले जात नाही. त्यामुळेच या काळात वापरात असलेला दुपट्टाही लपवून वाळवला जातो; त्यामुळे तो अर्धा ओला आणि सुका राहतो आणि त्याला कुबट वास येतो. परिणामी यावर सारासार विचार करत जनजागृती व्हावी म्हणून २८ मे रोजी ‘जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवसा’चे निमित्त साधून ‘ती फाउंडेशन’ने देशातील पहिल्या डिजिटल सॅनिटरी पॅड बँकेची स्थापना केली.
पॅड बँकेचे काम कसे चालते?
- ‘ती फाउंडेशन’च्या डिजिटल सॅनिटरी पॅड बँकेच्या १ लाख ७ हजार महिला सदस्य असून दरमहा नियमितरीत्या १० सॅनिटरी पॅड आम्ही मोफत देतो. बँकेतर्फे महिलांना ओळखपत्र देण्यात आले आहे. वर्सोवा विधानसभेत १० ठिकाणी सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन, डिस्पोझेबल मशीन लावले आहेत. शाळांमध्ये आम्ही सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन, डिस्पोझेबल मशीन आणि मेनस्ट्रूअल किट बसवतो तसेच शाळांमध्ये आम्ही मेन्स्ट्रूअल हेल्थ किटही देतो; जे फर्स्ट एड बॉक्सप्रमाणे असते. पहिल्यांदा पाळी येत असलेल्या मुलींसाठी हे मेन्स्ट्रूअल हेल्थ किट असून, त्यामध्ये सॅनिटरी नॅपकिन्स, २ निकर्स, वेदनाशमन गोळ्या यांचा अंतर्भाव असतो. हे किट मुख्याध्यापकांच्या रूममध्ये दर्शनी भागात लावले जाते जेणेकरून मासिक पाळीबद्दल प्रबोधन घडेल.
प्रतिसाद कसा आहे?
- पंजाब, हरियाणा, चंदीगड, बिहार, कर्नाटक, तामिळनाडू या विविध भागांसह पाकिस्तान, श्रीलंका, आफ्रिका या विविध देशांमधून याविषयी आम्हाला विचारणा करणारे ईमेल येत आहेत. चेन्नईमधील एका शाळेची मोफत सॅनिटरी पॅड्सची मागणी आहे. मुंबईतील मेडिकलची विद्यार्थिनी असलेल्या भावना इसरानीने इनस्टाग्रामद्वारे अपील करून २४ हजार सॅनिटरी पॅड तर राजवी आणि केतन बललारा या दाम्पत्याने बाराशे सॅनिटरी पॅड्स बँकेला मिळवून दिले. आम्हाला एड्सग्रस्त महिला आणि रेड लाईट भागात पॅड पुरवण्याची मागणी आली आहे.
किंमत कमी करण्यासाठी काय करता येईल?
- सॅनिटरी पॅडवर जीएसटी लावू नये. ते जीएसटी फ्री करण्यासाठी आम्ही केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी केली होती. आज सॅनेटरी पॅडच्या उत्पादनात ९८ टक्के बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. त्यामुळे सॅनेटरी पॅडची किंमत महाग असल्याने गरजू व आर्थिक दुर्बल गटातील महिलांना विकत घेणे परवडत नाही. त्यामुळे बचत गटांद्वारे सॅनेटरी पॅड उपलब्ध होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पॅडची गुणवत्ता राखण्यासाठी प्रयत्न आहे.
जनजागृती चळवळीसाठी काय प्रयत्न सुरू आहेत?
मासिक पाळीविषयी पुरुषांमध्ये जनजागृती करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. पुरुषांनी या लोकचळवळीत सहभागी व्हावे. कारण मासिक पाळीच्या ४ दिवसांमध्ये स्त्रीची काळजी घेणे फार गरजेचे आहे; हे आम्ही विविध शिबिरांद्वारे पटवून देतो. उच्चभ्रू शाळा सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन, डिस्पोझेबल मशीन लावण्यासाठी पुढाकार घेत नाहीत ही खंत आहे.
अंधश्रद्धा दूर होणेही तितकेच गरजेचे आहे. पाळी आलेल्या स्त्रीला धार्मिक कार्यांत मज्जाव, लोणच्याला शिवू नये, चार दिवस बाजूला बसावे; या जुन्या चालीरिती मोडून काढाव्यात. जाहिरातीत निळे रक्त न दाखवता लाल रक्त दाखवा, जेणेकरून ती जाहिरात अधिक रिअलिस्टिक वाटेल.
मुलाखत : मनोहर कुंभेजकर