पदवीच्या निकालास उजाडेल १५ आॅगस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 01:39 AM2017-07-29T01:39:44+5:302017-07-29T01:39:50+5:30

मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षांचे निकाल रखडले आहेत. त्यामुळे ते ३१ जुलैपर्यंत लावावेत, असे आदेश राज्यपाल व कुलपती विद्यासागर राव यांनी दिले आहेत.

padavaicayaa-naikaalaasa-ujaadaela-15-aengasata | पदवीच्या निकालास उजाडेल १५ आॅगस्ट

पदवीच्या निकालास उजाडेल १५ आॅगस्ट

Next

कल्याण : मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षांचे निकाल रखडले आहेत. त्यामुळे ते ३१ जुलैपर्यंत लावावेत, असे आदेश राज्यपाल व कुलपती विद्यासागर राव यांनी दिले आहेत. पेपर तपासण्यासाठी विद्यापीठाने महाविद्यालयांना प्रथम २४ ते २७ जुलैपर्यंत सुटी दिली. त्यानंतर, त्यात ३१ जुलैपर्यंत वाढ केली. मात्र, या वेळेतही पेपरतपासणी होणार नाही. सर्व शाखांचे निकाल जाहीर होण्यास १५ आॅगस्ट उजाडेल, असा दावा विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य प्रा. सुभाष आठवले यांनी केला आहे.
सक्तीची सुटी देऊन केवळ उत्तरपत्रिका तपासा, असा फतवा विद्यापीठाने काढला आहे. विद्यापीठाने उत्तरपत्रिका तपासण्यासाठी १४ हजार दोन शिक्षकांना उत्तरपत्रिका टॅग केल्या आहेत. हा आकडा पाहता उत्तरपत्रिका तपासण्यासाठी पुरेसे शिक्षक नाहीत. तरीदेखील, ९० टक्के उत्तरपत्रिका तपासून झाल्याचा दावा विद्यापीठ प्रशासनाने केला आहे. मात्र, तो चुकीचा आहे, असे प्रा. आठवले यांनी सांगितले. १०४ परीक्षांचे निकाल जाहीर केल्याचे विद्यापीठ सांगत आहे. पण, ४७७ परीक्षांचे निकाल बाकी आहेत. एका शिक्षकाला दिवसाचा किमान साडेतीन हजार रुपये पगार आहे. उत्तरपत्रिका तपासण्यासाठी महाविद्यालयांना सक्तीची सुटी दिली असली, तरी ज्यांच्याकडे उत्तरपत्रिका तपासण्याचे काम नाही, त्यांना विद्यापीठ बसून पगार देत आहे, असा मुद्दा आठवले यांनी मांडला.
विद्यापीठाचा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात किमान ९० दिवस तासिका घेतल्या पाहिजेत. प्रत्यक्षात ४० दिवसच तासिका घेतल्या जातात. अनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापकांना सरकारीकडून पगार मिळतो. सरकारला करातून मिळणाºया उत्पन्नातून हा पैसा खर्च केला जातो, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
कुलगुरू संजय देशमुख यांनी त्यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. प्रत्येक कुलगुरू हा त्याला मिळालेले पद हे ‘स्टेपिंग स्टोन’सारखे वापरतो. तो पदभार घेतल्यापासून शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल करण्याचे निर्णय जाहीर करतो. कारण, त्याला पुढे राजकारणात स्थिरस्थावर व्हायचे असते. राज्यसभेवर खासदारकी मिळवायची असते. या प्रयत्नात तो विद्यार्थिकेंद्री निर्णय घेतच नाही. यापूर्वीचे कुलगुरू राजन वेळूकर यांनी एक्सटर्नलला ६० व इंटरनलला ४० गुण देण्याचा फॉर्म्युला लागू केला. हा फॉर्म्युला परदेशात योग्य होता. परदेशात विद्यार्थी संख्या कमी असते. आपल्याकडे एका वर्गात १२० मुले शिकतात. प्रत्येक वर्षी प्रत्येक तुकडीत १० टक्के नैसर्गिक वाढ गृहीत धरली जाते. त्यांच्यानंतर देशमुख यांनी हाच फॉर्म्युला ६०-४० ऐवजी ५७-२५ असा लागू केला. याचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. ६०-४० च्या गुणपद्धतीच्या वेळी विद्यार्थी प्रथम वर्षाला होता. तो पदवीच्या अंतिम वर्षापर्यंत पोहोचण्याच्या वेळी त्याचा फॉर्म्युला हा ७५-२५ असा झाला. त्याला तीन वर्षांत वेगवेगळ्या गुणपद्धतीला सामोरे जावे लागले, असे आठवले म्हणाले.
आता परीक्षेच्या उत्तरपत्रिका स्कॅन केल्या आहेत. त्यात, दोन विद्यार्थ्यांच्या दोन वेगवेगळ्या विषयांच्या उत्तरपत्रिका एकाच वेळी स्कॅन झालेल्या आहेत. त्यामुळे तपासणीत अडचणी येत आहेत. तपासणीसाठी उत्तराचा नमुना दिला आहे. तो न जुळल्यास गुण कमी दिले जाणार आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण होण्याचा धोका आहे. वर्णनात्मक उत्तराबाबतीत काही निकष ठरवून दिले आहेत. विद्यापीठाचे केंद्र दुबई व अमेरिकेत सुरू करण्याचे कुलगुरू सूतोवाच करतात. रेल्वे अभ्यासक्रम सुरू करण्याचे सांगत आहेत. पदवीच्या तिसºया वर्षी लाइव्ह प्रोजेक्ट दिला जाणार आहे. मात्र, परीक्षांचे निकाल लावण्यात विद्यापीठ अपयशी ठरल्याचा मुद्दा आठवले यांनी मांडला.

निकालाअभावी रखडली नोकरी
एमबीएची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना खाजगी
कंपन्यांत नोकरीचे नियुक्तीपत्र मिळाले आहे. मात्र, त्यांचा निकाल लागला नसल्याने त्यांची नोकरी अडली आहे. आधी परीक्षापद्धती सुधारावी. त्यानंतरच त्यात आमूलाग्र बदल करण्याचा
विचार कुलगुरूंनी करावा,
अशी सूचना आठवले यांनी केली आहे.

Web Title: padavaicayaa-naikaalaasa-ujaadaela-15-aengasata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.