वसई : गेल्या चार दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे वसई तालुक्याच्या पूर्व भागातील ११ गावातील २५० हेक्टर जमिनीतील भातशेती पूर्णपणे नष्ट झाली. या शेतात पावसाचे पाणी शिरले असून अद्याप ते ओसरलेले नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने या गावातील शेतकऱ्यांना यंदा १ कोटी ७७ लाखांचे पीक कर्जवाटप केले आहे. हे कर्ज कसे फेडायचे अशा विवंचनेत येथील शेतकरी सापडले आहेत.वसई-विरार उपप्रदेशात गेल्या चार दिवसांत सुमारे ३०० मिमी पाऊस पडला. या अतिवृष्टीमुळे पूर्वेकडील पारोळ, शिरवली, भाताणे, नवसई, जांभूळपाडा, आडणे, शिरवली, सायवन, मेढे, आंबोडे व वडघर या ११ गावात सुमारे २५० हेक्टर जमिनीवरील भातपीके पाण्याखाली गेली आहे. गेले चार दिवस पाणी शेतीत साचून राहिल्यामुळे हाती आलेल्या भाताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाणी साचल्यामुळे भाताची रोपे कुजली. त्यामुळे या नुकसानीचे त्वरित पंचनामे महसूल विभागाने करावेत अशी सर्वत्र मागणी होत आहे. दरवर्षी या भागातील शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेतर्फे पीक कर्जाचे वाटप करण्यात येते. यंदाही बँकेने शेतकऱ्यांना १ कोटी ७७ लाख ८ हजार रु. चे वाटप केले आहे. शेतीचे झालेले नुकसान पाहून या गावातील शेतकरी चिंतेत पडला आहे. कर्जाची परतफेड कशी करायची असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे शासनाकडून नुकसान भरपाईची अपेक्षा करत आहेत. गेल्या वर्षी अवेळी आलेल्या पावसाने तसेच गारपिटीमुळे जिल्ह्यातील भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यावेळी पालघर, शहापूर,मुरबाड तालुक्यातील शेतीच्या नुकसानीचेपंचनामे कृषी अधिकाऱ्यांनी केले होते, असे राजन पाटील यांनी लोकमतला सांगितले. (प्रतिनिधी)
भातशेती पाण्यात वाहुन गेली
By admin | Published: July 31, 2014 12:16 AM