Join us  

पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर; 'हे' आहेत पुरस्काराचे मानकरी

By संजय घावरे | Published: October 16, 2023 7:26 PM

दया पवार स्मृति पुरस्काराचे यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमधील ‘रंगस्वर’ सभागृहात ज्येष्ठ पत्रकार आणि माजी खासदार कुमार केतकर यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. '

मुंबई - साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ साहित्यिक आणि भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी, सामाजिक कार्यकर्ते, मानवी हक्क कार्यकर्ते आमदार जिग्नेश मेवाणी हे यंदाच्या पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. चित्रकार राजू बाविस्कर यांना 'बलुतं' पुरस्कार जाहीर झाला आहे. 

दया पवार स्मृति पुरस्काराचे यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमधील ‘रंगस्वर’ सभागृहात ज्येष्ठ पत्रकार आणि माजी खासदार कुमार केतकर यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. 'काळ्या निळ्या रेषा' या आत्मचरित्रात्मक पुस्तकासाठी चित्रकार राजू बाविस्कर यांना ग्रंथाली पुरस्कृत 'बलुतं' पुरस्कार प्रदान करण्यात येईल. प्रत्येकी दहा हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. दया पवार स्मृती पुरस्कारांच्या मानकऱ्यांमधील डॉ. गणेश देवी हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध आहेत. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले देवी हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषाशास्त्रज्ञ, विचारवंत आणि सांस्कृतिक नेते आहेत. दुसरे मानकरी जिग्नेश मेवाणी हे व्यवसायाने वकील असून गुजरातमधील नेते आणि मानवी हक्क कार्यकर्ता म्हणून ओळखले जातात. ते सध्या गुजरात विधानसभेत वडगाम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. चित्रकार राजू बाविस्कर अनेक पुस्तकांचे मुखपृष्ठकार म्हणून मराठी साहित्याला परिचित आहेत. बाविस्करांची चित्रे कॅनव्हासच्या माध्यमातून समाजातील वंचित, शोषितांचे जीवन आपल्यासमोर मांडतात. पुरस्कार सोहळ्यात कवी-अभिनेता अक्षय शिंपीचे कथाकथन, ‘झुंड’फेम विपीन तातड आणि माही जी. रॅपलर ग्रुपचा कार्यक्रम होईल. सुत्रसंचालन पत्रकार अलका धुपकर करणार आहेत.

यासंबंधी अधिक माहिती देताना दया पवार प्रतिष्ठानचे सचिव प्रशांत पवार यांनी सांगितले की, दया पवार स्मृति पुरस्काराचे यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. सलग २५ वर्षे एखादी कृती सुरू ठेवणे हे आजच्या काळात सोपे नाही, मात्र प्रत्येक कार्यक्रमाला वाढत जाणारे जुन्या पिढीतले आणि नव्याने जोडले जाणारे दया पवारांचे तरुण चाहते या एकमेव गोष्टीमुळे दया पवार प्रतिष्ठानला हा कार्यक्रम करण्यासाठी नवीन उर्जा मिळत असते. सदर कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून दया पवारांच्या चाहत्यांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन दया पवार प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हिरा दया पवार यांनी केले आहे. 

आतापर्यंत या पुरस्काराने प्रेमानंद गज्वी, उत्तम कांबळे, प्रकाश खांडगे, हिरा बनसोडे, गंगाधर पानतावणे, विठ्ठल उमप, रझिया पटेल, जयंत पवार, दिनकर गांगल, वामन केंद्रे, लक्ष्मण गायकवाड, उल्का महाजन, ज्योती लांजेवार, उर्मिला पवार, समर खडस, कॉ. सुबोध मोरे, संजय पवार, गझलकार भीमराव पांचाळे, डॉ. जब्बार पटेल, शाहीर संभाजी भगत, लोकनाथ यशवंत, प्रतिमा जोशी, भीमसेन देठे आणि नागराज मंजुळे, वीरा राठोड, सुधारक ओलवे, गणेश चंदनशिवे, सयाजी शिंदे, राहुल कोसंबी, आनंद विंगकर, मेघना पेठे, शीतल साठे, मलिका अमर शेख, मंगेश बनसोडे, शरद बाविस्कर, अनिल साबळे, नितीन वैद्य, संतोष आंधळे आदी मान्यवरांना गौरविण्यात आले आहे.