Join us  

वांद्रेमध्ये ‘पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा उद्यान’

By संजय घावरे | Published: January 13, 2024 6:55 PM

पं. हरिप्रसाद चौरसिया, आशिष शेलार, राहुल शर्मा आणि मनोरमा शर्मा यांच्या उपस्थितीत रंगला नामकरण सोहळा

मुंबई : विश्वविख्यात संतूरवादक दिवंगत पद्मविभूषण शिवकुमार शर्मा त्यांच्या द्वितीय जयंतीचे औचित्य साधत वांद्रे पाली हिल येथील उद्यानाचे ‘पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा उद्यान’ असे नामकरण करण्यात आले आहे. उद्घाटन समारंभानंतर हे उद्यान नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. पं. शिवकुमार शर्मा यांनी भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रात संतूरला नवीन आयाम मिळवून देत या वाद्याला प्रतिष्ठा व लोकप्रियता मिळवून दिली आहे. 

उद्यान नामकरण सोहळ्याला बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, पं. शिवकुमार शर्मा यांच्या पत्नी मनोरमा शर्मा, त्यांचे पुत्र राहुल शर्मा यांच्या पत्नी बरखा शर्मा, पुत्र अभिनव शर्मा, ज्येष्ठ पुत्र रोहित शर्मा आणि पंडितजींचे चाहते उपस्थित होते. यावेळी पं. हरीप्रसाद चौरसिया यांनी संवाद साधत पं. शिवकुमार शर्मा यांच्या स्मृतींना उजाळा दिला. या प्रसंगी राहुल शर्मा म्हणाले की, या उद्यानाचे नामकरण माझे वडील संतूरवादक आणि संगीत रचनाकार पं. शिवकुमार शर्मा यांच्या नावाने करण्यात आल्याचा खूप आनंद आहे. यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार. या उद्यानाचे उद्घाटन पंडितजींच्या जयंतीच्या निमिताने होणे हा जणू दुग्धशर्करा योग आहे. त्यांच्या सर्व चाहत्यांना या महत्त्वाच्या प्रसंगी आम्ही निमंत्रित केले होते असेही राहुल म्हणाले.

या उद्यानाचे नूतनीकरण करण्यात आले असून, येथे विविध सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत. इथे येणाऱ्या निसर्गप्रेमींना शांतता व मनःशांती मिळावी यासाठी वातावरणनिर्मिती केली गेली आहे. त्या माध्यमातून शहरातील पर्यावरण संवर्धन व्हावे असे प्रयत्न केले गेले आहेत. पं. शिवकुमार शर्मा यांचे भारतीय संगीत क्षेत्रातील योगदान मोलाचे अहे. त्यांनी उस्ताद झाकीर हुसेन आणि पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्यासह संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गजांसोबत काम केले होते. चौरसिया यांच्याबरोबर ‘शिव-हरी’ या नावाने संयुक्तपणे संगीत दिग्दर्शन करत 'डर', 'सिलसिला', 'लम्हे', 'चांदनी' आदी गाजलेल्या चित्रपटांना संगीतही दिले. त्यांचे 'कॉल ऑफ व्हॅली', 'सांप्रदाय', 'एलीमेंट्स : वॉटर', 'म्युझिक ऑफ मांउटन्स', 'मेघ मल्हार' आदी अल्बम गाजले आहेत.