दीपिका पादुकोण या अभिनेत्रीला आपल्या लग्नाला नाही बोलावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2018 12:39 PM2018-01-29T12:39:14+5:302018-01-29T12:41:20+5:30
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या 'पद्मावत' सिनेमामुळे चर्चेत आहे. प्रचंड विरोध, वादविवादानंतर संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावत' सिनेमा अखेर 25 जानेवारीला बॉक्सऑफिसवर रिलीज झाला.
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या 'पद्मावत' सिनेमामुळे चर्चेत आहे. प्रचंड विरोध, वादविवादानंतर संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावत' सिनेमा अखेर 25 जानेवारीला बॉक्सऑफिसवर रिलीज झाला. सिनेमामध्ये दीपिका पादुकोणनं राणी पद्मावतीची भूमिका साकारली आहे. 'पद्मावत'ला मिळालेलं यश अनुभवत असलेली दीपिका नुकतेच आपली बहीण अनिषा पादुकोणसोबत अभिनेत्री नेहा धुपियाच्या 'वोग बीएफएफ' या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी पादुकोण बहिणींनी आपल्या मनातील काही गोष्टी जाहिररीत्या व्यक्त केल्या. बोलण्या-बोलण्यामध्ये दीपिकानं आपल्या लग्नात कोणत्या अभिनेत्रीला निमंत्रण देणार, हे देखील सांगितले.
कथित स्वरुपात दीपिका पादुकोणनं रणवीर सिंहच्या कुटुंबीयांसोबत मालदीव येथे न्यू इअर सेलिब्रेशन केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी दीपिका व रणवीरचा साखरपुडा उरकण्यात आल्याचे बोलले जात आहे. या माहितीवरुन कार्यक्रमादरम्यान नेहानं दीपिकाला हात दाखवण्यास सांगितले तेव्हा तिच्या हातात अंगठी वगैरे काहीही दिसले नाही. यानंतर नेहानं दीपिकाला लग्नासंदर्भातील काही प्रश्न विचारण्यात सुरुवात केली.
लग्नामध्ये दीपिकाला मनीष मल्होत्रा की सब्यासाची यापैकी कोणत्या डिझायनरचे कपडे घालायला आवडतील?असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा दीपिकानं सब्यासाची नावाला पसंती दिली. यानंतर कतरिना कैफला लग्नासाठी निमंत्रित करणार का ? असे विचारण्यात आल्यानंतर 'शक्यताच नाही', असे थेट उत्तर दीपिकानं यावेळी दिलं.
दीपिकाच्या या उत्तरामुळे तिच्यात व कतरिनामध्ये काहीही आलबेल नसल्याचं स्पष्ट दिसत आहे. रणवीर सिंहपूर्वी दीपिकाचं नाव अभिनेता रणबीर कपूरसोबत जोडले गेले होतं. बचना ए हसीनो (2008) या सिनेमानंतर दीपिकानं रणबीर कपूरच्या नावाचं टॅटूदेखील मानेवर कोरलं होतं. मात्र, 'अजब प्रेम की गजब कहानी' (2005) सिनेमादरम्यान रणबीर कपूर आणि कतरिना कैफमध्ये जवळीक वाढली आणि दीपिका व रणबीरच्या नात्यात दुरावा आला. दरम्यान, ब्रेकअपनंतर दीपिकानं रणबीर कपूरसोबत 'ये जवानी है दीवानी (2013)' आणि तमाशा (2015) सिनेमांमध्येदेखील काम केले. दोघांमध्ये मैत्रीचं चांगलं नातंदेखील आहे. मात्र अजूनही दीपिका आणि कतरिनाच्या नात्यात गोडवा येऊ शकलेला नाही.