'पद्मावत'ला 4 मोठ्या राज्यांत एन्ट्री नाहीच; मात्र महाराष्ट्र, पश्चिम बंगाल व दक्षिणेत जोरदार तिकीटविक्री सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 09:25 AM2018-01-25T09:25:01+5:302018-01-25T12:21:04+5:30

संजय लीला भन्साळी यांच्या वादग्रस्त ‘पद्मावत’ सिनेमाला होणारा विरोध पाहता राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा या चार राज्यातील मल्टिप्लेक्स असोसिएशनने चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Padmaavat : No show in 4 big states; smooth sailing in South, Maharashtra, West Bengal | 'पद्मावत'ला 4 मोठ्या राज्यांत एन्ट्री नाहीच; मात्र महाराष्ट्र, पश्चिम बंगाल व दक्षिणेत जोरदार तिकीटविक्री सुरू

'पद्मावत'ला 4 मोठ्या राज्यांत एन्ट्री नाहीच; मात्र महाराष्ट्र, पश्चिम बंगाल व दक्षिणेत जोरदार तिकीटविक्री सुरू

Next

नवी दिल्ली - संजय लीला भन्साळी यांच्या वादग्रस्त ‘पद्मावत’ सिनेमाला होणारा विरोध पाहता राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा या चार राज्यातील मल्टिप्लेक्स असोसिएशनने सिनेमा प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील अनेक भागांमध्ये राजपूत संघटना आणि करणी सेनेकडून हिंसक आंदोलनं सुरू आहेत.  

राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश व गोवामध्ये पद्मावतविरोधात हिंसक आंदोलनं होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, देशभरातील ७५ टक्के मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांचे प्रतिनिधित्व करणा-या ‘मल्टिप्लेक्स असोसिएसन आॅफ इंडिया’ या संघटनेने संभाव्य हिंसाचाराची भीती लक्षात घेऊन राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा या चार राज्यांमध्ये ‘पद्मावत’ हा चित्रपट न दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेचे अध्यक्ष दीपक अशर यांनी सांगितले की, या राज्यांमध्ये सुरू झालेला व होऊ शकणारा हिंसाचार पाहता, प्रेक्षकांच्या सुरक्षेसाठी आमचे सदस्य हा चित्रपट त्यांच्या मल्टिप्लेक्समध्ये दाखविणार नाहीत.

खरंतर हा सिनेमा डिसेंबर 2017मध्ये रिलीज होणार होता, मात्र करणी सेनेचा तीव्र विरोध आणि सेन्सॉर बोर्डकडून प्रमाणपत्र मिळण्यास उशीर झाल्यानं सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. यानंतर सेन्सॉर बोर्डच्या सूचनेनुसार 'पद्मावती' सिनेमाच्या नावात 'पद्मावत' असा बदल करण्यात आला. संपूर्ण देशभरात, विशेषतः उत्तर भारतात करणी सेनेकडून 'पद्मावत'ला तीव्र विरोध दर्शवण्यात येत आहे. बुधवारी एनसीआरमध्ये अनेक ठिकाणी करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी जाळपोळ आणि बसची तोडफोड केली. 

'पद्मावत'ला विरोध करणाऱ्या करणी सेनेचा शाळेच्या बसवर हल्ला
लज्जास्पद आणि तितकीच संतापजनक बाब म्हणजे 'पद्मावत' सिनेमाला विरोध करणाऱ्या कथित संस्कृती रक्षकांनी बुधवारी(24 जानेवारी) गुरुग्राममध्ये चक्क लहान मुले असलेल्या एका शाळेच्या बसवर हल्ला केला. बसमधील सीटचा आसरा घेत शाळकरी विद्यार्थी आणि शाळेच्या कर्मचा-यांनी कसेबसे स्वतःला या हल्ल्यातून वाचवलं. जमावाने दगड आणि काठ्यांनी बसच्या खिडकीच्या काचा फोडल्या. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार घडला तेव्हा बसमध्ये नर्सरी ते आठवी इयत्तेचे एकूण दहा विद्यार्थी होते. तसेच बसमध्ये एक शिक्षक, कंडक्टर आणि मदतनीसही होता. ही बस जात असलेल्या रस्त्यावर जमावाने आधीच हरियाणा वाहतूक विभागाच्या बसला पेटवली होती. त्यानंतर जमावाने शाळेच्या बसवरही हल्ला केला.  मात्र, कुणालाही दुखापत झाली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. 

संजय लीला भन्साळींच्या घराबाहेर वाढवली सुरक्षा 

‘पद्मावत’ सिनेमा प्रदर्शित होण्याच्या पूर्वसंध्येला ठाणे आणि डोंबिवलीत खेळ बंद पाडण्याचा प्रयत्न करणा-या करणी सेना, राजपूत सेना तसेच हिंदू सेनेच्या सुमारे ४० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सिनेमात मुख्य भूमिकेत असलेल्या दीपिका पादुकोण, शाहिद कपूर, रणवीर सिंह, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या घराबाहेरही सुरक्षा वाढविण्यात आली आहे. ‘पद्मावत’ सिनेमाविरोधात बुधवारी (24 जानेवारी) ठाणे आणि डोंबिवली शहरात करणी सेना, राजपूत सेना तसेच हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून खेळ बंद पाडण्याचा प्रयत्न केला. ठाण्यातून सुमारे २०, तर डोंबिवलीतही १५ ते २० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, पोलीस बंदोबस्तात चित्रपटाचा खेळ सुरळीत सुरू ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पुण्यात करणी सेनेच्या 15 जणांना अटक

'पद्मावत' सिनेमाला विरोध करण्यासाठी २० ते २५ जणांच्या जमावाने पुणे शहरातून जाणा-या सातारा - मुंबई महामार्गावरील वाहनांवर दगडफेक करून तोडफोड केली. या दगडफेकीत किमान १० वाहनांचं नुकसान झालं आहे. ही घटना महामार्गावरील वडगाव पुलालगतच्या सर्व्हिस रोडवर मंगळवारी(23 जानेवारी) मध्यरात्री १२ च्या सुमारास घडली. याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी घटनास्थळावरून १५ जणांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

 

Web Title: Padmaavat : No show in 4 big states; smooth sailing in South, Maharashtra, West Bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.