'माझ्या मित्राला पद्मभूषण'... क्वारंटाईन असतानाही शरद पवारांचा एक्टीव्ह मोड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 01:38 PM2022-01-26T13:38:58+5:302022-01-26T13:46:39+5:30
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावेळी, एकूण 128 नागरिकांना हा पुरस्कारे जाहीर करण्यात आला आहे.
मुंबई - हेलिकॉप्टर अपघातात वीरमरण आलेले संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्यासह महाराष्ट्राच्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे, उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंग यांना मंगळवारी पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला. तर देशात कोरोनाची लस तयार करणाऱ्या पुण्यातील उद्योजक सायरस पुनावाला यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला. वैद्यकीय क्षेत्रात देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार घोषित करण्यात आला. त्यानंतर, पुनावाला यांचे मित्र आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावेळी, एकूण 128 नागरिकांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
सायरस पुनावाला यांच्यासह पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य, आयटी क्षेत्रात देशाचे नाव कोरणारे सुंदर पिचई, सत्या नडेला, गुलाम नबी आझाद व महाराष्ट्राचे नटराजन चंद्रशेखर यांनाही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. त्यात, महाराष्ट्रातील 10 जणांचा पद्म पुरस्काराने गौरव होणार आहे.
So proud of my batchmate Cyrus Poonawala for being awarded Padma Bhushan for the outstanding contribution in the field of medicine.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 25, 2022
सीरम इंस्टीट्यूटचे प्रमुख सायरस पुनावाला यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर शरद पवार यांनी ट्विट करुन मित्राचे अभिनंदन केले आहे. “माझा बॅचमेट असलेल्या सायरस पूनावाला यांचा मला फार अभिमान वाटतो. त्यांना औषध क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय,” असं ट्विट शरद पवार यांनी केलं आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याबाबतही त्यांनी स्वत:च ट्विट करुन माहिती दिली होती. सध्या ते क्वारंटाईन असून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहेत. या काळातही ते देशातील घडामोडींवर आपला सक्रीयपणा ऑनलाईन दाखवून देत आहेत.
त्यातच त्यांच्या मित्राला भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांना आनंद झाला आहे. म्हणूनच, आजारी असतानाही त्यांनी ट्विट करुन मित्राचे जाहीरपणे अभिनंदन केले आहे.