Join us

Padman Movie Review : पॅडमॅन... एका झपाटलेल्याचा झंझावाती अन् प्रेरणादायी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2018 1:30 PM

'चीनी कम', 'पा', 'शमिताभ', 'की अँड का' यासारख्या सिनेमांचं दिग्दर्शन केल्यानंतर आता आर. बाल्की यांचा पॅडमॅन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

सिनेमाचं नाव : पॅडमॅनदिग्दर्शक : आर बाल्कीस्टार कास्ट: अक्षय कुमार, राधिका आपटे, सोनम कपूर, अमिताभ बच्चनकालावधी : 2 तास 19 मिनिटेसर्टिफिकेट : U/Aरेटिंग : 3.5 स्टारमुंबई -  'चीनी कम', 'पा', 'शमिताभ', 'की अँड का' यासारख्या सिनेमांचं दिग्दर्शन केल्यानंतर आता आर. बाल्की यांचा पॅडमॅन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आर. बाल्की यांनी केवळ मनोरंजनाच्या दृष्टीकोनातून एक सिनेमाच नाही बनवला तर याद्वारे महत्त्वपूर्ण संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. सिनेमाची कहाणी अरुणाचलम मुरुगनंथम यांच्या आयुष्यावर आधारित आहे. मुरुगनंथम यांना जगभरात पॅडमॅन नावानं ओळखलं जातं. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारनं सिनेमामध्ये मुरुगनंथम यांची भूमिका साकारली आहे. दरम्यान, पॅडमॅन सिनेमा 25 जानेवारीला रिलीज होणार होता, मात्र याच दिवशी संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावत' सिनेमा रिलीज झाल्यानं पॅडमॅनची रिलीजची तारीख 9 फेब्रुवारी करण्यात आली.    

मध्य प्रदेशातील महेश्वर येथे राहणारे लक्ष्मीकांत चौहान (अक्षय कुमार ) यांची कहाणी सिनेमामध्ये दाखवण्यात आली आहे. देशातील केवळ 12 टक्केच महिला मासिक पाळीदरम्यान पॅडचा वापर करतात, तर उर्वरित महिला अस्वच्छ कपडे, पान आणि राख यांसारख्या शरीरास हानिकारक असलेल्या पद्धतींचा अवलंब करतात. यामुळे अनेक आजारांचा संसर्ग होतो किंवा होण्याची शक्यता अधिक असते.  अशातच मासिक पाळीदरम्यान आपल्या पत्नीला होणारा त्रास पाहून लक्ष्मी आपले कुटुंबीय आणि समाजाविरोधात लढून समस्यांविरोधात उपाय शोधून काढतो. खूप कठीण परिश्रम करुन तो स्वस्तातली मशीन बनवतो, जेणेकरुन महिलांना स्वस्त सॅनेटरी पॅड उपलब्ध होऊ शकेल.

यादरम्यान, लक्ष्मीकांत आपली बहीण, पत्नी आणि आईसाठी पॅड बनवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, या प्रयत्नांना त्याच्या कुटुंबीयांसहीत गावकरीही घाणेरडे आणि अयोग्य असल्याचं ठरवतात.  यानंतर लक्ष्मीकांतची पत्नी गायत्री (राधिका आपटे) त्याला सोडून माहेरी निघून जाते. यावेळी आपलं लक्ष्य पूर्ण करण्याच्या उद्देशानं लक्ष्मीकांत गावातून शहराकडे येतो. येथे त्याची परी (सोनम कपूरसोबत) ओळख होते. परी लक्ष्मीकांतला त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेरित करते. लक्ष्मीकांत आपले ध्येय पूर्ण करतो आणि यशस्वी होतो. स्वस्त दरातील सॅनेटरी पॅडची निर्मिती केल्यानंतर एक आदर्श उदाहरणाप्रमाणे जगासमोर उभा राहतो. 

आर. बाल्की यांनी सिनेमाचं भन्नाट दिग्दर्शन केले आहे. तर पीसी श्रीराम यांची सिनेमेटोग्राफीदेखील कमाल आहे. सिनेमाचं चित्रिकरण अप्रतिमच आहे. शिवाय, सोनम कपूर, राधिका आपटे यांच्यासहीत सह कलाकारांनीही चांगला अभिनय केला आहे. सिनेमा पाहताना अक्षय कुमार पूर्णतः 'पॅडमॅन'च्या भूमिकेत शिरल्याचं पाहायला मिळत आहे. पॅडमॅनच्या निमित्तानं अक्षय पुन्हा एकदा चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणार एवढं नक्कीच.

सिनेमाची शेवटची 10 मिनिटं तुम्हाला बांधून ठेवतात. विशेषतः यूएनमधील लक्ष्मीकांतचं (अक्षय कुमार) सर्वांसमोरील भाषण.  सिनेमाचा इंटरव्हलपूर्वीचा भाग थोडासा हळू वाटेल पण सिनेमा एकदातरी पाहण्यासारखा आहे, कारण याद्वारे महिलांच्या मासिक पाळीसंदर्भातील महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला आहे.  

टॅग्स :पॅडमॅनअक्षय कुमारराधिका आपटेट्विंकल खन्ना